साइज नव्हे; फॅशन महत्त्वाची

दिपाली ढबू
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

फॅशनचा विचार करताना सगळ्यात आधी मोजमापं जाणून घ्यायला हवीत. ऑनलाइन शॉपिंग करताना आपल्याला प्रत्येक वस्तूची आपली स्वतःची साइज माहिती असायला हवी. प्लस साइजच्या फॅशनला मी कर्व्ही फॅशन म्हणते. प्लस साइज म्हणत नाही. प्रत्येक साइज ही साइज असते. त्यात प्लस वगैरे काही नसतं, असं मला वाटतं. कर्व्ही फॅशनदेखील इतर साइजच्या फॅशनप्रमाणं देखणी असते. फक्त त्यासाठी योग्य फॅब्रिक आणि ट्रेंंड निवडावा लागतो. 

फॅशनचा विचार करताना सगळ्यात आधी मोजमापं जाणून घ्यायला हवीत. ऑनलाइन शॉपिंग करताना आपल्याला प्रत्येक वस्तूची आपली स्वतःची साइज माहिती असायला हवी. प्लस साइजच्या फॅशनला मी कर्व्ही फॅशन म्हणते. प्लस साइज म्हणत नाही. प्रत्येक साइज ही साइज असते. त्यात प्लस वगैरे काही नसतं, असं मला वाटतं. कर्व्ही फॅशनदेखील इतर साइजच्या फॅशनप्रमाणं देखणी असते. फक्त त्यासाठी योग्य फॅब्रिक आणि ट्रेंंड निवडावा लागतो. 

फॅब्रिक हुशारीने निवडा
सिल्क आणि कॉटनचे उच्च दर्जाचे फॅब्रिक ही सगळ्यात महत्त्वाची गुंतवणूक आहे. पॉलिस्टर शक्‍यतो वापरू नका. ते शरीराला घट्ट चिकटणारे फॅब्रिक असते. प्रिंटचे कपडे हा सगळ्यात चालणारा ट्रेंड आहे; मात्र प्रिंट निवडताना आनंददायी दिसेल, असे निवडा. कपड्यांची साइज प्रत्येक ब्रॅंडनुसार वेगवेगळी असते. त्यामुळे ट्रायल रूममध्ये जातानाच वेगवेगळ्या साइजचे कपडे हाती असू द्या. एखादा कपडा परिधान करून आरशासमोर उभं राहिल्यावर चेहऱ्यावर स्मित उमटतं. तीच कपडे फिट बसल्याची पावती असते. 

शरीराचा आकार आणि कपडे
स्वतःच्या शरीराचा आकार नीट समजून घ्या. आकारानुसारच कपडे निवडण्याची सवय लावून घ्या. वाळूच्या घडाळ्याच्या आकारातील शरीर असेल, तर त्या आकाराला सुटेबल कपडेच निवडा. साधारणतः चौकोनी आकार असेल, तर थोडे गडद रंगाचे कपडे घ्या. शरीराच्या आकारांना आंतरराष्ट्रीय संज्ञा आहेत. जसा वाळूच्या घडाळ्यासारखा आकार, चौकोनी आकार म्हटलं, तसाच पिअर फळाचा आकारही असतो. अशा व्यक्तींनी गडद रंग आणि त्या रंगाला बॅलन्स करेल, असे वेगवेगळे रंग वापरावेत. जे काही कपडे आपण खरेदी करतो आहोत, ते कपडे शरीरावर अत्यंत नेटकेपणाने फिट होत आहेत, हे पाहत राहा. यामागे कोणताही फॉर्म्युला नाही. जे कपडे आपल्या चेहऱ्यावर स्मित आणतात, स्वतःविषयी आनंद निर्माण करतात, ते कपडे योग्य आहेत, असे मानता येते. त्यामुळे जास्तीत जास्त कपडे ट्राय करा. सगळ्या ट्रेंडच्या पाठीमागे धावण्यात अर्थ नाही. काहींना ट्रेंडचे कपडे योग्य ठरतात; काहींना नाही. क्‍लासिक स्टाइलचे कपडे फिट बसत असतील, तर तेच वापरावेत. आपल्याला कशाचा अभिमान वाटतो आणि आपल्याला कशावर भर द्यायचा आहे, हे ठरवा. तसं झालं, की कपड्यांची स्टाइल आपोआप योग्य निवडली जाते. 

रंग आणि अॅक्‍सेसरिज्‌ 
कपड्यांचे रंग आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यामुळे रंगांची निवड अतिशय महत्त्वाची असते. रंग निवडीबाबत प्रयोग करा. तुमच्या अंगावर खुलून दिसणारे रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे लोकांना आकर्षित करतात. उदाहरणार्थ, गडद रंगाचे नेकलेस किंवा फ्रेश रंगांचा स्कार्फ, रंगीबेरंगी टॉप असेल तर वेस्ट-बेल्ट वापरणे. कायम खुलून दिसण्यासाठी प्रिंटेड स्कार्फ्सची वेगवेगळी डिझाइन्स वॉर्डरोबमध्ये असू द्या. शिवाय, वेगवेगळ्या डिझाइन्सची नेकलेसदेखील असू द्या. शॉर्टस्‌, टी शर्टस्‌, जीन्सवर वापरण्यासाठी केप उपयोगी असतात. बॅग किंवा शूज या गोष्टी उपयुक्ततेवर आणि आरामदायी वाटावे या कारणांसाठी निवडल्या जातात. त्यांची निवड कपड्यांसारखी किचकट नसते. अगदीच हव्यात, अशा ॲक्‍सेसरिज नियमित जवळ बाळगा. त्यामुळे तुमच्या एकूण कपड्यांनाही उठाव येतो आणि व्यक्तिमत्त्व खुलते. 

चांगल्या शूजमध्ये गुंतवणूक करा
उठावदार रंगाचे शूज, निऑन्स, चकचकीत फिनिशिंग आणि पुरेसे हिल्स असतील, तर आपल्या चालण्यात डौलदारपणा येतो. गर्दीत आपले व्यक्तिमत्त्व अधिक रुबाबदार दिसण्यासाठी योग्य शूज निवडणे महत्त्वाचे आहेत. आपले कपडे नेटके असतील, तर शूज त्याला ’चार चाँद’ लावतात. कोणत्याही कपड्यांवर कधीही वापरता येतील, अशा शूजमध्ये गुंतवणूक करा. शूज हिल्स असू देत किंवा फ्लॅट असू देत, ते हवेत हे मात्र खरे. 

बनवून घेतलेले कपडे
कपडे शरीराच्या आकारानुसार असले पाहिजेत. शरीराला घट्ट चिकटणारे कपडे वापरूच नका, असे काही मी म्हणणार नाही. योग्य इनर वेअर्स असतील, तर घट्ट चिकटणारे कपडेही खुलून दिसू शकता़़त; मात्र ढगळ कपडे वापरू नका, असे मी सुचवेन. अशा कपड्यांनी शरीराची ठेवण बेढब दिसते. रेडिमेड कपडे सर्वसाधारण साइज डोळ्यासमोर ठेवून बनवलेले असतात. तुम्हाला एखादे डिझाइन आवडले आणि साइज फिट बसत नसेल, तर असे कपडे शिवून घेणे योग्य ठरेल. हो, त्यात वेळ जाईल; मात्र शेवटी तुमच्या शरीराला आरामदायी वाटणारी फॅशन परिधान करता येईल. कपडे शिवून घेताना तुम्हाला हवे तसे डिझाइन आणि रंग निवडता येतात, हाही एक मोठा फायदा. 

मेकअप आणि केशरचना
आपण कसे दिसतो, याचा एक भाग कपडे आहे. लिपस्टिकचा रंग, नखं रंगविण्यासाठी वापरलेले रंग, आयलायनर इत्यादी प्रकारही आपल्या दिसण्यावर खूप परिणाम करतात. आपलं व्यक्तिमत्त्व बदलविण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे मेकअप. समजा एखादी नवी स्टाइल आपण निवडलीय आणि ती नीट दिसतेय की नाही याबद्दल खात्री नाही; तर नवी हेअर स्टाइल करून बघा किंवा नव्या स्टाइलचा हेअर कट करा.

स्वतःमधल्या संपूर्ण वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शनच आपल्याला घडेल. फेशियल, मॅनिक्‍युअर, पेडिक्‍युअर या गोष्टी आत्मविश्वास वाढविणाऱ्या असतात. त्याचा परिणाम आपल्या दिसण्यावरही होतो. स्टाइल म्हणजे अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नीट लक्ष घालून त्या परिपूर्ण बनवणे.  

शॉपिंग टिप्स 
आपण कधीतरी आकारानं कमी होऊ आणि मग कपडे नीट बसतील, या अपेक्षेनं कधीही लहान आकाराचे कपडे खरेदी करू नका. या क्षणी आपल्या शरीरावर जे कपडे फिट बसतात आणि जे तुम्हाला आनंद देतात, तेच निवडा. 

आयुष्यात ध्येय ठेवणं एकूण छानच; मात्र त्यासाठी वर्तमान नाकारता येत नाही. त्यामुळं, इथं ज्या टिप्स दिल्यात त्या जरी कर्व्ही स्टाइल्ससाठी असल्या, तरी सर्वसाधारण आकाराच्या महिलांनाही वापरात आणता येतील. साइज कधीही फॅशनवर सत्ता गाजवू शकत नाही, इतकंच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या