आपली आवड हीच आपली फॅशन

विक्रम फडणीस
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

फॅशन इंडस्ट्रीमधलं वलयांकित नाव म्हणजे विक्रम फडणीस. बॉलिवूड कलाकारांच्या बरोबरीनं किंवा मोठमोठ्या फॅशन शोमध्ये हे नाव आदरानं घेतलं जातं. तनिष्काच्या फॅशन विषयावरील अंकासाठी विक्रम फडणीस यांनी अतिथी संपादक होण्याचं मान्य केलं. तनिष्काच्या वाचकांसाठी फॅशनबद्दल माहिती सांगताना त्यांनी काही टिप्सही दिल्या आहेत... 

फॅशन इंडस्ट्रीमधलं वलयांकित नाव म्हणजे विक्रम फडणीस. बॉलिवूड कलाकारांच्या बरोबरीनं किंवा मोठमोठ्या फॅशन शोमध्ये हे नाव आदरानं घेतलं जातं. तनिष्काच्या फॅशन विषयावरील अंकासाठी विक्रम फडणीस यांनी अतिथी संपादक होण्याचं मान्य केलं. तनिष्काच्या वाचकांसाठी फॅशनबद्दल माहिती सांगताना त्यांनी काही टिप्सही दिल्या आहेत... 

तनिष्का मैत्रिणींनो, विक्रम फडणीसचा नमस्कार! तनिष्काचा फॅशनविषयक अंक आपल्यापुढे मांडताना विशेष आनंद वाटतो आहे. फॅशन इंडस्ट्रीशी मी गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ संबंधित आहे. माझं आयुष्य फॅशन आहे. माझं ब्रेड-बटर फॅशन आहे. फॅशनचा अर्थ अनेक जण उथळ घेतात; पण प्रत्यक्षात ही इंडस्ट्री उथळ नक्कीच नाही. फॅशन तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी, तुमच्या विचारांशी जोडलेली असते. तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावीपणे सादर करण्यात फॅशनचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे आपली आवड हा विचार करून मगच फॅशन करा. दुसऱ्याने केली म्हणून आपण फॅशन करायची असं करू नका. दुसऱ्याला चांगलं दिसेल ते आपल्याला दिसेलच किंवा कम्फर्टेबल वाटेल असं अजिबात नाही. फॅशन ही पावलोपावली बदलते असं म्हणतात. सध्याचा काळ जागतिकीकरणाचा आहे. या काळात जगभरातल्या फॅशन आपल्यापर्यंत खूप वेगाने पोचतात. आपल्या देशातली फॅशनही जगभर पोचत असते.  

फॅशन ही जागतिक भाषेसारखी झाली आहे. प्रत्येक देशाची फॅशन जगभर सार्वत्रिक होत आहे. मला वाटतं, फॅशन हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. त्याला ठराविक मर्यादा घालता येणार नाही. त्याला देशांच्या सीमा नाहीत, त्याला वयाची मर्यादा नाही, त्याला जात-धर्म असे काही भेद नाहीत. फॅशन ही फॅशन आहे. वेगळंच जग आहे ते.

फॅशनला खूप आधीपासून, कॉलेजच्या काळापासून म्हटलं तरी चालेल, फॅशनची आवड होती. त्यात तुम्ही स्वतःला सतत अपडेट करावं लागतं. स्वतः सतत वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. कोणाला कोणती फॅशन चांगली दिसेल याचं काही सूत्र नसतं. त्या त्या व्यक्तिमत्त्वानुसार, प्रत्येकाच्या प्रोफेशननुसार त्याला कोणत्या पद्धतीचे कपडे, कशा प्रकारच्या ॲक्‍सेसरिज चांगल्या दिसतील हे ठरतं.

फॅशन इंडस्ट्री म्हणजे माझं सर्वस्व आहे. कळायला लागल्यापासून मी याच इंडस्ट्रीचा विचार केला आहे. इथल्या जगाशी एकरूप झालो आहे. अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. प्रत्येक कलाकाराची आवड वेगळी असते. ती आवड समजावून घेऊन त्यांच्यासाठी ड्रेस डिझाइन करावा लागतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी ड्रेस मिळता-जुळता ठरला तरच ते व्यक्तिमत्त्व अधिक खुलतं. चित्रपटाबाबतीतही असंच सांगता येईल. चित्रपटातली भूमिका समजून घेणं, त्या कलाकाराची ठेवण लक्षात घेणं हे गरजेचं आहे. हे सगळं सूत्र जुळलं तरच त्या वेशभूषेची मदत ती भूमिका खुलवण्यासाठी होते. त्यामुळं फॅशनमध्ये ‘स्वतःला साजेसं असंच...’हे सूत्र वापरणं महत्त्वाचं आहे. 

डिझायनर ब्रॅंडची भारतात आता खऱ्या अर्थाने ओळख होऊ लागली आहे. अलीकडे सर्वसामान्य लोकांनाही नेहमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, लग्नाच्या निमित्तानं डिझायनरकडं जावंस वाटतं. फॅशन इंडस्ट्रीमधली ही खूपच चांगल्या प्रगतीची खूण आहे, असं म्हणावं लागेल. डिझायनर ब्रॅंड आता सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचत आहेत. 

बाई कामाच्या निमित्ताने आता बाहेर पडते आहे. त्यामुळे पूर्वी पुरुषांसाठी जसे ऑफिस वेअर किंवा फॉर्मल कपडे असायचे, तसे आता स्त्रियांसाठीही होत आहेत. ऑफिस वेअर तयार करणारे काही ब्रॅंडही आता दिसतात; पण सर्वसामान्यपणे बघता डिझायनर ब्रॅंड असाच विचार सध्या अधिक वेगाने पुढे येताना दिसत आहे.

माझ्या व्यक्तिगत करिअरचा विचार केला तर फॅशन माझं आयुष्य आहेच; पण ‘हृदयांतर’ सिनेमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा दिग्दर्शनात उतरलो. या चित्रपटातल्या सगळ्या भूमिकेचं ड्रेस डिझायनिंग मीच केलं आहे. हा चित्रपट तयार करताना दिग्दर्शनाऐवजी सुरवातीच्या काळात ड्रेसकडं अधिक लक्ष राहायचं; मात्र मी स्वतःला बजावलं. जवळजवळ सहा महिने मी फॅशन इंडस्ट्रीपासून लांब राहिलो. या चित्रपटाच्या निर्मितीनंतर अनेकांनी मला विचारलं, की मी फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित सिनेमा का केला नाही? मला काही वेगळं करण्याची इच्छा होतीच आणि दुसरं म्हणजे मला ती इंडस्ट्री सोडून काही प्रयोग करायचे होते. म्हणून मी थोडा भावनिक सिनेमा तयार केला. भविष्यात एखादा फॅशनशी संबंधित सिनेमा मी तयार करीनही; मात्र त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. फॅशन हे माझं प्रोफेशन आहे. 
बॉलिवूड कलाकारांबरोबर मी काम करतो. त्यांच्याही आवडीनिवडी खूप आहेत. एक-दोन कलाकार आहेत, ज्यांना हवे तसे कपडे डिझाइन करण्यासाठी खूप बारीक-सारीक गोष्टी समाजावून घ्याव्या लागतात.

अनेक फॅशन शो मी सादरीकरण केले आहेत. यामध्ये वेडिंग कलेक्‍शन किंवा साड्यांचे कलेक्‍शनही सादर केले. यानंतरही नवीन प्रयोग करून सादर करण्याचा विचार आहे. आजकाल डिझायनर स्टायलिस्ट ही कन्सेप्टही रुजत आहे. लोकांच्या आवडीनुसार डिझायनरकडून वॉर्डरोबसाठी किंवा ठराविक कार्यक्रमाच्या ड्रेस डिझायनिंगसाठी सल्ला घेतला जातो.  

तनिष्का मासिकाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधता आला, याचा आनंद वाटतो. या अंकातून फॅशनची माहिती देणारे वेगवेगगळे लेख दिले आहेत, ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. तरीही काही टिप्स द्यायच्या झाल्यास -

स्त्रियांसाठी भारतीय परंपरेचे कपडे वापरण्याचा ट्रेंड नेहमीच दिसतो. महत्त्वाच्या मिटिंग, मोठे कार्यक्रम यासाठी साडी अधिक ग्रेसफूल दिसते. अलीकडे पाश्‍चात्य पद्धतीचे कपडे वापरण्याचा ट्रेंड आहे. त्यानुसार सोयीचे वाटत असतील तसे कपडे वापरायला काहीच हरकत नाही. फॅब्रिकमध्ये मी म्हणेन त्या ड्रेसची गरज बघावी; मात्र कॉटन हे माझं सगळ्यात आवडतं फॅब्रिक आहे. आपल्याकडच्या ऋतूंमध्ये ते सूटही होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आरामदायीही राहतं. 

सगळ्यांत महत्त्वाचं आणि पुन्हा पुन्हा मला सांगावंस वाटतं, की आपल्याला आरामदायी वाटतील अशाच कपड्यांची निवड करा. तीच आपल्यासाठीची फॅशन असेल. अशा बाबतीत तुम्हीही कधीतरी स्वतःच्या फॅशन डिझायनर होऊ शकता. बघा तरी प्रयोग करून...तुमच्यामध्येही फॅशनचा तो सेन्स असू शकेल! त्यामुळं हे तत्त्व पाळा, ‘माय चॉइस इज द बेस्ट फॅशन’.

संबंधित बातम्या