बीजकोषातील साठा 

डाॅ.ममता दिघे (आयव्हीएफ तज्ज्ञ)
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

स्त्रीच्या बीजकोषात अंडी तयार होतात आणि त्यानंतरच गर्भधारणा होत असते. अनेकदा पाळी नियमित सुरू असते. लग्न होतं. सगळं सुरळीत सुरू असतं; मात्र गर्भधारणा होत नाही. काही वर्षांनी तपासण्या सुरू होतात. बीजकोषात अंडी कमी असतील तर गर्भधारणा होणं कठीण जातं. अंडी वाढवणं आपल्या हातात नाही; मात्र असलेल्या अंड्यांचा साठा करता येतो. सध्या तरी मातृत्वाच्या वाढत चाललेल्या वयासाठी हा एक पर्याय आहे, असं म्हणावं लागेल... 

राधाचं लग्न होऊन चार वर्षं झाली; पण अगदी अलीकडेच सहा महिन्यांपासून तिने गर्भधारणेचा विचार करायचं ठरवलं. तसं पाहिलं तर काहीच समस्या नव्हती. मासिक पाळीचं चक्र नियमित असूनही आणि योग्य वेळी संयोग करूनही गर्भ मात्र राहत नव्हता. जागरूक जोडपं असल्यानं त्यांनी लगेचच वंध्यत्व तज्ज्ञांची भेट घ्यायचं ठरवलं. काही चाचण्या केल्यावर असं लक्षात आलं, की बीजकोषातील अंड्यांचा साठा अगदीच कमी आहे. बीजाशयातील अंड्यांची संख्या खूपच रोडावली आहे. हे ऐकून दोघांना आश्‍चर्याचा धक्का बसला; परंतु हल्ली राधासारख्या स्त्रियांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. म्हणूनच स्वतःच्या बीजकोषातील साठ्याविषयी जाणून घेणं अत्यंत आवश्‍यक झालं आहे.
पाळी सुरू होणं हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. तिच्या आयुष्याला जणू एक नवं वळणं मिळत असतं. पाळी सुरू झाली, की स्त्री म्हणून तिचा प्रवास सुरू होतो आणि तिचं ऋतुचक्र नियमित झालं की आईचा जीव भांड्यात पडतो. मासिक पाळी नियमित नसल्यानं अनेक मुली धास्तावलेल्या असतात. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी, कामाचा ताण या सगळ्यांमुळे या समस्या अलीकडे वाढत आहेत. आजकाल बऱ्याच वेळा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुलींना लवकर घर सोडून आपापलं राहावं लागतं आणि त्याबरोबर खूप गोष्टी आपल्या आपण सांभाळाव्या लागतात. यामुळे त्यांना स्वतःच्या खाण्याकडे आणि व्यायामाकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. पाळी नियमित नसेल तर काहीतरी धोक्‍याची सूचना मिळते, तरी पण काही वेळेस पाळी अगदी नियमित असते तरीही नंतर त्रास जाणवतो. याचाच अर्थ पाळी नियमित असली तरी सगळं आलबेल असतंच असं नाही. याविषयी नीट जाणून घेणं हे सध्या मुलींसाठी व त्यांच्या आयांसाठी अतिशय महत्त्वाचं झालं आहे. अशी माहिती घेतल्यामुळे संभाव्य धोके वेळीच लक्षात येऊ शकतील.

बीजसाठा ः बीजसाठा म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का असतो? हे आपण जाणून घेऊ. प्रत्येक मुलीच्या बीजकोषात जन्मतःच काही बीजे असतात. हा आकडा ठरलेला असतो आणि त्यानंतर कालांतराने तो कमी कमी होत जातो. सगळी अंडी जेव्हा वापरली जातात किंवा नष्ट होतात, तेव्हा विशिष्ट वेळी मासिक पाळी बंद होते. ही गोष्ट व्हायला, १२-१३ व्या वर्षी पाळी सुरू होण्यापासून पाळी बंद होईपर्यंत असा अनेक वर्षांचा कालावधी जायला लागतो. विशिष्ट वेळी बीजकोषात असलेली अंड्यांची संख्या म्हणजे बीजसाठा. हे खरं आहे, की लहान वयात हा साठा अधिक चांगला असतो; पण अशी कल्पना करूया की एखाद्या मुलीच्या बीजकोषात काही कारणांनी अंड्यांची संख्या अगदी कमी आहे किंवा काही कारणांनी कमी झाली आहे, अशी परिस्थिती असेल तर बीजसाठा भराभर कमी होऊन लवकरच संपल्याने मासिक पाळी लवकर बंद होते. यातून दोन प्रकारचे धोके उद्भवतात. एक म्हणजे, वर वर पाहता या गोष्टीची काहीच सूचना मिळत नाही. पाळी नियमित असते, स्राव व्यवस्थित असतो आणि काय होतंय ते कळण्याचा काहीच मार्ग त्यामुळे नसतो. दुसरा धोका म्हणजे पाळी जाण्याचे सामान्य संकेत मिळण्याच्या वयाच्या १३ वर्षे आधीच सृजनक्षमता कमी कमी होत जाते. याचाच अर्थ जर संकेत दिसण्याची वाट पाहत बसलो तर अशा स्त्रियांचा बीजसाठा तोपर्यंत खूपच कमी झालेला असून गर्भ राहण्याची शक्‍यता उपचार घेऊनही खूप कमी असते, अगदी राधासारखा. त्यांना मग इतका कमी बीजसाठा असल्याने गर्भधारणा अवघड आहे, हे ऐकून धक्का बसतो.  वय वाढत जाते तसा बीजसाठा कमी कमी होत जातो. आज तो कमी असेल तर काही काळाने नक्कीच अधिक कमी असेल. अंडी बीजकोषातूनच यावी लागतात. कोणीही ती तिथे घालू शकत नाही. म्हणूनच सर्व अंडी संपली की गर्भधारणा अशक्‍य होऊन बसते. जर ही माहिती गर्भधारणेचा विचार करण्याआधी किंवा पुढे ढकलण्याआधी मिळालेली असेल तर स्त्रियांना त्यांच्या पाळीचे गणित समजून घेऊन गर्भधारणा कधी होऊ द्यायची ते ठरवता येऊ शकेल. 
प्रत्येक स्त्रीचा स्वतंत्र बीजसाठा असतो आणि त्याविषयी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचा बीजसाठा कमी असेल, तर गर्भधारणा पुढे ढकलणं योग्य ठरणार नाही. जर साठा व्यवस्थित असेल तर गर्भधारणेचा विचार जाणीवपूर्वक योग्य वेळी करता येईल. ज्या स्त्रियांना गर्भारपण पुढे ढकलायचं आहे त्यांच्यासाठी बीजसाठ्यातून अंडी सुरक्षित ठेवण्याची सोय उपलब्ध आहे; जेणेकरून अंडी गोठवून भविष्यात वापरता येऊ शकतात. यासाठी गुगल व फेसबुकसारख्या कंपन्या त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणसुद्धा पुरवतात. स्वतःची सृजनक्षमता जाणणे आणि ती टिकवण्यासाठी उपाय करणे आता शक्‍य आहे आणि त्यामुळे स्त्रियांना याची माहिती असली पाहिजे. प्रगतीला सीमा नसते आणि दररोज नवनवीन मार्ग निर्माण होत जातील. आपण आयपॉड, आयफोनच्या युगात आहोत. आपला बीजसाठा जाणून घेण्याचे, बाळ होऊ शकणे, याव्यतिरिक्तही अनेक फायदे आहेत. गर्भधारणेचा विचार करण्याआधी किंवा पुढे ढकलण्याआधी बीजसाठ्याची चाचणी करणे आणि पाळीविषयक समस्यांवर उपाय शोधणे हितकारक आहे. 

बीजसाठ्याचा फायदा काय?
 सुषमाला करिअर करायचं होतं. शिक्षण संपून नोकरीत स्थिरावेपर्यंत वयाची तिशी गाठली होती. त्यानंतर लग्न केलं; पण लग्न झालं तेव्हा तिची प्रमोशनची संधी होती. नवऱ्यालाही स्वतःच्या व्यवसायात प्रगती करायची होती. तोपर्यंत दोघांनाही मूल नको होतं. दोन-तीन वर्षं गेली आणि नंतर प्लानिंग नसतानाही गर्भधारणेला समस्या उद्भवली. अलीकडच्या काळात मुली करिअर करण्यामागे असतात. यामुळे लग्नाचा आणि मूल होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला जातो. वय वाढल्यानंतर बीजकोषातील अंड्यांची संख्या कमी होते आणि गर्भधारणा होण्यात समस्या निर्माण होते. अशावेळी पूर्वनियोजन व्यवस्थित असेल, तर बीजकोषातील अंड्यांची तपासणी करता येते. त्यांची संख्या कमी वाटत असेल, तर ती काढून साठवता येतात. त्यानंतर हव्या त्या वेळी गर्भधारणेसाठी समस्या उद्भवत नाही.

 सुषमापेक्षा अमृताची गोष्ट थोडी वेगळी होती. अमृताचं लग्न झालं आणि काही दिवसांतच तिचा घटस्फोट झाला. पहिल्या लग्नाच्या प्रकरणातून सावरल्यानंतर अमृताने दुसऱ्या लग्नाचा विचार केला; मात्र हवा तसा पार्टनर कधी मिळेल याची तिलाही खात्री नव्हती. तिने तज्ज्ञ डॉक्‍टरांची भेट घेतली. बीजकोषात अंड्यांची संख्या कमी होत असल्याचे तपासणीतून लक्षात आले, त्यामुळे वेळीच बीजसाठ्याचा निर्णय घेण्यात आला. जवळजवळ दीड वर्षाने आता सुषमाला हवा तसा पार्टनर मिळाला आहे. आता बीजकोषात अंड्यांची संख्या योग्य प्रमाणात झाली असल्याने गर्भधारणेची समस्या ती सोडवू शकेल.

 थोडक्‍यात लग्न करणं किंवा गर्भधारणेचा विचार लांबणीवर टाकला जाणार असेल तर बीजासाठा महत्त्वाचा ठरतो. डॉक्‍टर असलेल्या रमानेही याचा अवलंब केला. तिनं लग्न उशिरा करायचं, असं आधीचं ठरवलं होतं. वयाच्या तिशीनंतर तिनं लग्नाचा विचार केला. नवरा आणि ती दोन स्वतंत्र देशात राहत होते. लग्नानंतर मूल होण्याचा निर्णयही लगेच घ्यायचा नाही, असं दोघांनी ठरवलं होतं; पण लग्नाच्या आधीच रमानं बीजसाठा करून ठेवला होता. त्यामुळं गर्भधारणेबाबत ती फारशी चिंतेत नव्हती. करिअर, आयुष्याची स्वप्न पाहणं आणि पूर्ण करण्याची धडपड यामध्ये रोजचं आयुष्य अक्षरशः हातातून निसटत असतं. शरीराचं घड्याळ पुढे पुढे पळत असतं. अंड्यांच्या साठ्यात होणारी घट रोखणं आत्ता तरी आपल्या हातात नाही. योग्य वेळ गाठणं हेच आपल्या हातात आहे. बीजकोषाचे वय रोखण्याच्या दिशेनं संशोधन सुरू आहे; पण तोपर्यंत.... 
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतीय स्त्रियांविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. कोकेशियन स्त्रीच्या मानाने भारतीय स्त्रीचा बीजसाठा ६ वर्षांनी कमी आहे. याचाच अर्थ, कोकेशियन स्त्रीपेक्षा भारतीय स्त्रीची सृजनक्षमता ६ वर्षं आधी कमी होते. या माहितीवर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे आणि गर्भधारणेची शक्‍यता वाढवण्यासाठी व स्त्रियांच्या सर्जक आरोग्यासाठी, बीजकोषातील साठ्याविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
 

संबंधित बातम्या