चॉकलेटच्या सोप्या रेसिपी

अमृता तळेकर
गुरुवार, 31 मे 2018

चॉकलेटची चव सर्वांनाच आवडते. चॉकलेट अगदी कधीही, केव्हाही खायला आवडतं. याच चॉकलेटपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले, की त्याची चव... म्हणजे..वा...! चॉकलेटची चव वेगवेगळ्या रूपात चाखण्यासाठी या काही रेसिपी...

चॉकलेट पुडिंग
साहित्य - डार्क चॉकलेट ५० ग्रॅम, कॉर्न स्टार्च २ चमचे, साखर दीड कप, मीठ पाऊण चमचा, कोको पावडर २ चमचे, दूध २ कप, तांदळाचे पीठ १ चमचा, फ्रेश क्रिम ३ चमचे, व्हॅनीला इन्सेन्स अर्धा चमचा. 

कृती - एका पॅनमध्ये साखर, कोको पावडर, तांदळाचं पीठ, कॉर्न स्टार्च, मीठ टाकून मिक्स करावे. त्यात थोडे दूध घालत ढवळत राहावे. मिश्रण एकजीव झाल्या वर मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. त्यात डार्क चॉकलेटचा चुरा घालून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे. उकळी आल्यावर त्यात फ्रेश क्रिम टाकून मिक्स करावे व गॅस बंद करावा. नंतर इन्सेन्स घालून मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. काचेच्या ग्ला समध्ये हे मिश्र ण ओतून फ्रिजमध्ये ३-४ तास सेट होऊ द्यावे. वरून ड्रायफ्रूट्सचे काप घालून थंड गार पुडिंग सर्व्ह करावं.

न्यूट्रिशियस चोको डिलाइट
साहित्य - कोको पावडर २ चमचे, ६-७ बी काढून बारीक केलेले खजूर, अक्रोडचे काप अर्धा कप, कोकोनट पावडर २ चमचे, काजू/ बदाम/पि स्ता काप अर्धा कप, तूप दोन चमचे

कृती - कढईत तूप टाकून त्यावर वरील सर्व साहित्य घालावे. थोडे परतून काढून घ्यावे. खजूर घातल्या ने वेगळी साखर घालायची गरज नाही. थोडे गार झाल्या वर लाडू वळावेत किंवा गरम असतानाच तूप लावलेल्या ताटावर थापून वड्या पाडाव्यात. थोडा वेळ सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. अतिशय हेल्दी आणि टेस्टी कोको डिलाइट रेडी.

बनाना चोको कॅंडी
साहित्य - रॉ चॉकलेट, केळी, ड्रायफ्रूट्स (आवडीनुसार), कोकोनट पावडर

कृती - रॉ (कुकिंग) चॉकलेट डबल बॉयलर मेथडने वितळवून घ्यावे. केळ्याचे दोन मोठे काप करून घ्यावेत. त्याला टुथपिक लावावी. एका थाळीत कोकोनट पावडर व ड्रायफ्रूट्सचे काप मिक्स करून घ्यावे. टुथपिक लावलेलेकेळे मेल्टेड चॉकलेटमध्ये घोळवून कोकोनट पावडर व ड्रायफ्रूट्सच्या मिश्रणात घोळवावे.
नंतर बटर पेपरवर ठेवून फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवावे. चॉकलेट घट्ट झाले की बनाना चोको कॅंडी तयार.

इन्स्टंट चॉकलेट आइस्क्रीम
साहित्य - कोको पावडर १ कप, मिल्क पावडर १ कप, दूध दीड कप, फ्रेश क्रिम १ कप, साखर १ कप (आवडीनुसार)

कृती - वरील सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरने मिक्‍स करून घ्यावे. त्यात आवडीनुसार अक्रोड, बदाम, चॉकले टचे तुकडे टाकता येतील. हे मिश्रण टिनमध्ये ओतून टिन बंद करून फ्रिजरमध्ये सेट व्हायला ठेवावे. इन्स्टंट चॉकलेट आइस्क्रीम तयार. या मिश्रणात अर्धी कॉफी पावडर आणि अर्धी कोको पावडर घालून कॉफी चॉकलेट आइस्क्रीम बनवता येते.

इन्स्टंट चॉकलेट मगकेक
साहित्य - मैदा ४ चमचे, दूध तीन चमचे, पिठीसाखर ३ चमचे, तूप/बटर/ तेल १ चमचा, कोको पावडर २ चमचे, व्हॅनीला इन्सेन्स पाऊण चमचा, बेकिंग पावडर पाऊण चमचा, ड्रायफ्रूट्सचे काप १ चमचा

कृती - एका मगमध्ये (दुधाचा मोठा कप), वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. मिश्रण नीट एकजीव झाल्या वर मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर साधारण दीड मिनिट ठेवावे. केक छान फुलून वर येतो. आवडीनुसार गरम किंवा गार करून खावे.

संबंधित बातम्या