नातं प्रेमाचं..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

‘व्हॅलेंटाइन डे’ ही परदेशी कल्पना; पण आपल्याकडं निमित्त म्हणून हा दिवस अनेकजण साजरा करतात. कॉलेजच्या वयात असेपर्यंत असे दिवस म्हणजे नुसतीच धमाल असते. लग्नानंतर मात्र त्याचं रूप बदलतं. नवरा-बायकोच्या नात्यातलं प्रेम, विश्‍वास दाखवण्याचंही हे एक निमित्त ठरतं. बरे-वाईट प्रसंग सगळ्यांवरच येतात. प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ-उतार असतात; पण प्रत्येक वेळी महत्त्वाची असते ती परस्पराची साथ. नवरा आणि बायको हे एक उत्तम टीमवर्क असतं. ज्यात एक कमजोर पडायला लागला तर दुसरा सबल होऊन आधार देतो. प्रत्येकानं दुसऱ्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा मान राखून त्याला तेवढी ‘स्पेस’ द्यावी लागते. 

अर्थात, आजकाल ‘स्पेस’ द्यायला स्वतःकडे तरी किती स्पेस आहे, याचा विचार करावा लागेल. मध्यंतरी व्हॉट्‌स ॲपवर एक कविता फिरत होती 

खरंच का रे तुला 
माझं मन कधीच कळत नाही..?
की माझ्या मनापर्यंत पोहोचण्याचा 
वेळच तुला मिळत नाही?
समजून घे मला, फक्त दागिने 
आणि साड्यांनीच आनंद मिळत नाही 
खरंच का रे तुला 
माझं मन कधीच कळत नाही..?

करिअरमागे धावणारा नवरा आणि ठरावीक वयानंतर स्वतंत्र झालेली मुलं, यामध्ये त्यांच्या मागे धावणाऱ्या बाईचीच ही व्यथा. वयाच्या एका ठरावीक टप्प्यावर ती जणू आधारहीन बनते. प्रत्येकाच्या विश्‍वातून बाहेर काढलेल्या तिला स्वतःच्या आयुष्यात नैराश्‍य येतं. यातून अनेकदा बायका व्यसनांच्या शिकार बनतात. जगल्या तरी सतत कोणत्या तरी तणावाखाली जगतात. यातून आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतात. मग ‘बिझी’ नवरा आणि ‘बिझी’ मुलं तिच्या किरकिरीला कंटाळतात आणि ती आणखीनच नैराश्‍येच्या गर्तेत जाते. यातून तिला उपाय असतो तो आर्थिकबरोबर भावनिक स्वावलंबी होण्याचा, कारण केवळ आर्थिक स्वावलंबी असणाऱ्या काही बायकांची स्थितीही फारशी बरी नाही. दिवसभर कष्ट करून मनासारखी एकही गोष्ट मिळत नसलेल्या बायकांची संख्या कमी नाही. दिवसभर राबराब राबायचं; पण ‘सिनेमाला येतेस का?’ असं मैत्रिणीनं विचारलं तर मात्र उत्तर असतं, ‘त्यांनी परवानगी दिली तरच.!’

बदलणाऱ्या समाजात या गोष्टीची अपेक्षा नाही, घडतंय मात्र तसंच. 
महिला विकासाचा दर सर्वदूर पोहोचतो आहे. स्त्री स्वतंत्र हक्काबद्दल जागी झालीय, लढतीय..! हे सगळं खरंच आहे. तरीही हळूहळू जागी झालेली स्त्री ‘नवऱ्याची परवानगी’ या शब्दांत अडकतेच आहे. साधंच उदाहरण, या महिन्यात अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पाचा विचार किती जणींना करता आला? ‘दिनूचं बिल’ गोष्ट माहितीय? आईनं दिलेल्या कामासाठी दिनू बिल तयार करतो. आई मात्र केलेल्या कामासाठी ‘काही नाही’ असं बिल करते. आयुष्यात आईला किंवा एकूणच बाईला गृहीतच धरलं जातं. तिच्या कामाची, कष्टाची किंमतच जाणवत नाही. अमाप कष्ट करूनही तिच्या श्रमाची प्रतिष्ठा नाही, यामुळेच व्यवहार करण्याचा आत्मविश्‍वासच तिच्यात निर्माण झालेला नाही. स्त्री आपल्या कुटुंबासाठी काय-काय करते, याचा विचार केला तर यादी न संपणारी आहे. हल्लीच्या काळात नवराही मुलासारखी तिच्याकडे बिले पाठवेल की काय, अशी शंका येते. माझं मन कळावं एवढीच तर तिची अपेक्षा आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’सारख्या निमित्तानं तरी तिची इतकीशी अपेक्षा पूर्ण व्हावी..!

संबंधित बातम्या