घर ते ऑफिस रस्सीखेच 

अंजली तागडे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

सकाळ झाली की घरची जबाबदारी. घरची कामं आटोपून ऑफिसला जायची तयारी. जाताना ट्रॅफिकचा त्रास. ऑफिसमध्ये वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या. ते संपतानाच जाता- जाता घरच्या कामाचे विचार सुरू. पहाटेपासून सुरू झालेलं काम रहाटगाडगंच बनतं. असं न होता घर आणि ऑफिसचं काम यात समन्वय साधावा लागेल, तरच या दोन्ही कामांच्या पूर्ततेचा येणारा ताण टाळता येईल आणि दिवस आनंदात जाईल. 

सकाळ झाली की घरची जबाबदारी. घरची कामं आटोपून ऑफिसला जायची तयारी. जाताना ट्रॅफिकचा त्रास. ऑफिसमध्ये वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या. ते संपतानाच जाता- जाता घरच्या कामाचे विचार सुरू. पहाटेपासून सुरू झालेलं काम रहाटगाडगंच बनतं. असं न होता घर आणि ऑफिसचं काम यात समन्वय साधावा लागेल, तरच या दोन्ही कामांच्या पूर्ततेचा येणारा ताण टाळता येईल आणि दिवस आनंदात जाईल. 

आई! अजून अंधार नाही पडला, तू का आलीस?’’ आमिषाच्या या अनपेक्षित धक्का देणाऱ्या प्रश्‍नानं मेघाला गलितगात्र केलं. रोजच्या वेळेपेक्षा एक तास लवकर घरी आलेल्या आईला आनंद देण्याऐवजी आमिषानं अंतर्मुख केलं. दररोजचा स्वयंपाक आणि घरातलं सगळं आवरून दहा वाजता ऑफिसची वेळ साधणं, तिथल्या कमिटमेंट, मीटिंग, कामकाज टार्गेट असंख्य कामकाजात व्यस्त राहणाऱ्या मेघाला आमिषा दीड वर्षाची असल्यापासून नोकरी करणं भाग पडलं. घरात आर्थिक मदत करणं, दोन नणंदांच्या लग्नाची कर्जं फेडणं आणि आपलं घर वर आणणं, हे ध्येय उराशी बाळगून ती काम करत होती. अर्थात, आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे, हा उद्देश होताच. लहानपणापासून शेजारच्या काकू, मावशी, माझी सासू, तुझी सासू, 

माझी नणंद .... हे पहिलं होतं, त्यातून मन मोकळं होत असेल; पण मेघाला काही त्यात गुंतायला आवडलं नाही, त्यामुळंच सद्‌दिवेकाला स्मरून सतत नोकरी करण्यात आणि अर्थार्जन करण्यात तिला जास्त रस वाटला. 
स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेल्यावर सर्वच महिला शिक्षण घेऊ लागल्या; पण त्याबरोबरच नोकरी करताना चूल अर्थात स्वयंपाकघर, येणे-जाणे, लग्नकार्य, आजारपण, मुलं जन्माला येण्या आधीपासून ते मोठे होईपर्यंत आई, सून, मुलगी, वहिनी, नणंद, भावजय अशा एक न अनेक भूमिका याच रंगमंचावर एकपात्री प्रयोगासारख्या यशस्वी करायच्या, हे प्रत्येकीनं ठाम ठरवलं. मात्र, हे ‘सुपर वुमन’ बनण्याचं धाडस करून आपण आपल्यातीलच माणसाला, स्वतःला, शरीराला मनाला कुठेतरी गृहीत धरतोय. 

कोणत्याच पातळीवर अपयशी व्हायचे नाही. आई म्हणून मुलांचं खाणं, संगोपन, आरोग्य सगळं सांभाळायचं. पत्नी म्हणून सर्व इतिकर्तव्यं पार पाडायची. सून म्हणून प्रतिमा जपायची. हे सगळं करताना शरीर आणि मनावर किती ताण येतो याचा विचारच केला जात नाही. 

वर्षाचच उदाहरण. नोकरीच्या निमित्तानं दोघं पुण्यात स्थायिक. आई(सासू) एकटीच असल्याने त्याही त्यांच्याबरोबर पुण्यात. त्या कायम बेडवर, ऑफिसला जाताना त्यांचं सर्व खाणं-पिणं, औषधं सगळं काही काढून त्यांना सहज घेता येईल असं ठेवायचं आणि बाहेरून कुलूप घालून जावं लागायचं. सर्व क्रिया जागेवर असल्यानं आल्यावर त्यांची स्वच्छता करावी लागायची.  

आरतीला दोन मुलं. नवरा बिझनेसमन आणि तिची सरकारी नोकरी. तिची नोकरी १३ किलोमीटर अंतरावर एका गावात. सकाळी उठल्यावर रोज अंगण झाडलेलं लागतं, असा घरचा नियम, त्यामुळं अंगण, घर, स्वयंपाक, मुलांचं आवरणं, मधल्यावेळची खाण्याची तयारी, सासू-सासऱ्यांची पथ्यं सगळं सांभाळताना तिचा जीव मेटाकुटीला यायचा. नोकरीतही जबाबदारीची पोस्ट असल्यानं कोणासमोर घरचा फोन आला तरी पंचाईत. मुलं व्यवस्थित गेली असतील का? डबा विसरली नसतील ना, गृहपाठ वही आठवणीनं दिली होती, नक्की नेली असेल ना, अशा एक न अनेक शंका तिची पाठ सोडत नसत. त्या सगळ्याचा ताण घेऊन तिला आता ब्लडप्रेशरची गोळी मागे लागली आहे.  

लग्न झालं की, घरातील मोठ्या माणसांना लगेच नातवंडांची घाई असते. त्यात आजकाल नवरा-बायको नोकरी करणारे असतात. तिला नोकरी करून नवीन घर, माणसं सगळ्यांशी जुळवून घेताना नाकी नऊ येतात, अशा वेळी दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ हवा असतो. एका अर्थानं मोठ्यांचं म्हणणं बरोबर असलं तरी नाण्याला दुसरी बाजू असतेच. एकदा मुलं झाली की, स्त्री खूप अडकत जाते आणि सगळ्या डगरींवर हात ठेवताठेवता ‘माझी न मी राहिले अशी...’अशी होते, श्रेयाचं असंच काहीसं झालं. मुलं झाल्यावर नवऱ्याचं काहीच रूटीन बदललं नाही; पण तिचं मात्र शरीर, मन, वेळ, झोप सगळंच बदललं. याचं इतकं नैराश्‍य आलं की, तिला मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली.  

नवऱ्याला गरम पोळ्या, मुलीला पिझ्झा, मुलाला इडली आणि दिराला आवडती भाजी, सासूसासऱ्यांची पथ्यं आहेतच, असं सगळं करताकरता अवंतिकाला आपली ऑफिसची दहाची वेळ पाळणं अशक्‍य होत होतं. तिला त्यामुळं येणारा ताण, होणारी परवड कोणालाच दिसत नव्हती का? पण करतीय ना करू दे, आपण कुठे म्हणालो, तू हे कर म्हणून. तीच करते खरं तर. सर्वांची मनं जिंकून ‘कुटुंब’ या संज्ञेला मानणारी अवंतिका हळूहळू शरीराची क्षमता कमी पडल्यानं ‘ॲनिमिया’ची शिकार बनली. समुपदेशन आणि औषधोपचारानंतर घरकामाला बाई लावली. काही कामं सासू आणि नवऱ्यानं वाटून घेतली; परंतु त्यासाठी कान सोनारानेच टोचावे लागले. आजारी पडल्यावर शिरा करण्यापेक्षा सहज खावा वाटला म्हणून आपण शिरा का करत नाही? 

तनुजाची तशी फिरतीची नोकरी. मार्केटिंगचा जॉब असल्यानं आणि दिवसेंदिवस जबाबदाऱ्या जास्त पडत असल्यानं तिनंही त्या घरातील सर्वांच्या अटी स्वीकारल्या. तिला घरातून नवरा, मुलांची साथ होती. पहाटे ५ वाजता उठून कुठे दौऱ्यावर जायचं असेल तर तू फक्त पोळ्या करून जा. मी बाकी पाहतो आणि तसं करणारा नवरा लाखात विरळाच, त्यामुळे तारेवरची कसरत होत असली तर तिच्या प्रयत्नाला त्याची साथ तिचा ताण थोडा तरी हलका करीत असे. 

माझ्या बहिणीची मैत्रीण स्वाती. दोघं चांगल्या ठिकाणी नोकरी करणारे समंजस, मनमिळाऊ पण नवऱ्याला माणसांचं व्यसन. भरवस्तीत राहत असल्यानं घरात कायम माणसांचा राबता. त्यांची सरबराई ठेवणं तिला जिकिरीचं होत असे, त्यासाठी घरात सतत जास्तीच्या सर्व गोष्टींचं नियोजन करावं लागे. घरात भाजी आहे का? घरात मुलांनी पसारा तर केला नसेल ना, ऑफिस ते घर अंतर दहा किलोमीटरचं होतं. दिवसभर काम केल्यावर ट्रॅफिकमधून प्रवास करून आल्यावर तिचा जीव अगदी दमून जाई. घरी आल्यावर काय वाढून ठेवलं असेल, याची तिला चिंता असायची. हे सगळं करताकरता सकाळी अंघोळीला तिला जेमतेम वेळ मिळायचा. नाष्टा, खाणं-पिणं तर लांबच. 

घराघरांत अशीच उदाहरणं दिसतात. अर्थार्जनासाठी नोकरी करत असताना तिला घरी मिळालेली मदत तिचा ताण कमी करू शकते. अशा प्रकारचा फारसा ताण पुरुषाला कदाचित येत नसेल, कारण दोघं एकाच वेळी नोकरीवरून घरी आले तरी तो रिमोट घेऊन बसतो आणि ती मात्र चहा पाणी आणि स्वयंपाकाला लागते. घरी आली तरी घरची ड्युटी सुरू.  ‘ति’च्या पंखांना भरारी दिली तर कोणत्याच आईला आमिषानं अंतर्मुख केलं तरी मेल्याहून मेल्यासारखं होणार नाही.

संबंधित बातम्या