'मल्टिबॅगर'ची संधी आणि सावधगिरी

अर्चना गोऱ्हे
बुधवार, 27 डिसेंबर 2017

'मल्टिबॅगर शेअर' हा शब्द आता शेअर बाजारामध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. त्या संबंधित रोज नवनव्या अगंतुक शिफारशी (टिप्स) आपल्या मोबाइलवर अनेक अपरिचित नंबरवरून येताना दिसत आहेत. त्यामध्ये संबंधित शेअरमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळू शकतो, अशा प्रकारचे 'खात्रीपूर्वक' अंदाज दिले जातात. अशा प्रकारच्या 'टिप्स' फसव्या असतात व त्या शेअर बाजारामध्ये गैरप्रकार करणाऱ्या लोकांसाठी फायद्याच्या असतात. ही मंडळी तेच शेअर विकून नफा कमावून बाहेर पडण्यासाठी याचा वापर करतात. त्यामुळे अशा फसव्या मोबाईल संदेशांपासून गुंतवणूकदारांनी अतिशय जागरूक आणि सावध राहण्याची गरज आहे. 

'मल्टिबॅगर शेअर' हा शब्द आता शेअर बाजारामध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. त्या संबंधित रोज नवनव्या अगंतुक शिफारशी (टिप्स) आपल्या मोबाइलवर अनेक अपरिचित नंबरवरून येताना दिसत आहेत. त्यामध्ये संबंधित शेअरमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळू शकतो, अशा प्रकारचे 'खात्रीपूर्वक' अंदाज दिले जातात. अशा प्रकारच्या 'टिप्स' फसव्या असतात व त्या शेअर बाजारामध्ये गैरप्रकार करणाऱ्या लोकांसाठी फायद्याच्या असतात. ही मंडळी तेच शेअर विकून नफा कमावून बाहेर पडण्यासाठी याचा वापर करतात. त्यामुळे अशा फसव्या मोबाईल संदेशांपासून गुंतवणूकदारांनी अतिशय जागरूक आणि सावध राहण्याची गरज आहे. 

पण याचा अर्थ 'मल्टिबॅगर शेअर' हा शब्द धोकादायक आहे, असा नव्हे. याचा खरा संदर्भ समजून घेणे गरजेचे आहे. 'मल्टिबॅगर शेअर' याचा थोडक्‍यात अर्थ एका पिशवीतून नेलेल्या पैशाच्या मोबदल्यात अनेक पिशव्या भरून पैसे मिळतील, अशा खरेदीच्या संधी! अर्थात अशा संधी या कोणीतरी आपल्याला येऊन सांगेल, असे नाही. त्यासाठी संबंधित शेअरचा व तो शेअर ज्या कंपनीचा आहे, त्या कंपनीच्या क्षेत्राचा, व्यवस्थापन व उत्पादनाचा अभ्यास असणे गरजेचे आहे. बरेचदा काही कंपन्या तत्कालीन परिस्थितीमुळे काही वेळा वाईट कामगिरी करतात. परंतु, परिस्थितीतील बदलामुळे अशा कंपन्यांमध्ये आलेली तात्पुरती मरगळ दूर होऊन पुन्हा एकदा त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे वार्षिक निकाल यात सुधारणा होऊ शकते. अर्थात त्याचा परिणाम त्यांचा शेअर बाजारातील भावावर होऊ शकतो. हा परिणाम सामान्यतः मिळणाऱ्या शेअर बाजारातील परताव्यापेक्षा अनेक पटीने जास्त असू शकतो, म्हणूनच आपण त्या शेअरला 'मल्टिबॅगर' असे म्हणतो. 

आपण वरील विवेचनावर उदाहरणासह विचार करू शकतो. 2008-09 च्या दरम्यान जागतिक आर्थिक मंदीमुळे सर्वच शेअर बाजारात मोठी मरगळ आली होती. शेअर निर्देशांक जवळपास 50 टक्‍क्‍यांनी घसरले होते. याचा परिणाम त्या काळी चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांवरही झाला होता. भारतात जे. एम. फायनान्शियल किंवा एडलवाईज या दोन्ही कंपन्यांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, या दोन्ही कंपन्या 2009 नंतर 2013 च्या अखेरपर्यंत नवनवीन नीचांकी भावपातळीला पोहोचत राहिल्या. जागतिक स्तरावर नंतर पुन्हा आर्थिक सुधारणा झाली. त्यामुळे वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांना पुन्हा चांगला व्यवसाय मिळू लागला. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या दोन्ही कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढत गेले. त्यांचे हे भाव बाजारात वाढलेल्या निर्देशांकापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगाने वाढले. 2013 अखेर रु. 20 या किमान पातळीवर पोचलेला जे. एम. फायनान्शियलचा शेअर 2017 मध्ये रु. 190 पर्यंत म्हणजे नऊपटीपेक्षा जास्त वाढला. त्याच कालावधीत बाजाराचा निर्देशांक फक्त दुपटीने वाढला. एडलवाईज या कंपनीची 2013 व 2017 मधील भावपातळी पाहिल्यास हेच दिसून येईल, की आपण जर या कंपन्यांचे व्यवस्थापन व इतर गोष्टी यांचे योग्य विश्‍लेषण केले असते तर आपल्याला हे 'मल्टीबॅगर शेअर' चांगला फायदा देऊ शकले असते. 

अजून एक उदाहरण घ्यायचे झाले, तर 'टाटा स्टील'चे घेता येईल. परकी गुंतवणूक अव्यवहार्य ठरल्याने ही कंपनी 2009 मध्ये गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राहिली नव्हती. परंतु व्यवस्थापन चांगले होते, उत्पादन चांगले होते. पण परकी गुंतवणूक अव्यवहार्य ठरल्याच्या एकमेव कारणामुळे त्यांचे निकाल वाईट येत गेले. पण परकी करार किंवा गुंतवणुकीचे परिणाम दुरुस्त झाल्यानंतर कंपनीच्या शेअरला चांगला भाव आला. 2009 ते 2014 पर्यंत टाटा स्टीलचे निकाल वाईट येत होते. या काळात शेअरचा भाव रु. 170 पर्यंत खाली आला होता. त्यानंतर त्यांच्या परकी गुंतवणुकीचे दुष्परिणाम दूर झाले, त्यातील त्रुटी दूर झाल्या व त्याच्या शेअरभावात वाढ दिसू लागली. सद्यःस्थितीत या कंपनीच्या शेअरचा भाव रु. 710 वर पोचला आहे. 

थोडक्‍यात काय, तर 'मल्टिबॅगर शेअर' निवडण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा विचार आणि अभ्यास केला पाहिजे. कंपनी कोणत्या क्षेत्रातील आहे, त्या कंपनीच्या आगामी काळातील योजना, त्यांचा आढावा, त्यानुसार भविष्यात काय बदल होतील याचा विचार, त्यादृष्टीने कंपन्यांची निवड करणे योग्य ठरते. अशा कंपन्यांचे ताळेबंद तपासावेत, त्या लाभांश देतात का, त्या कर्जमुक्त आहेत का, प्रवर्तकांचा हिस्सा किती आहे, तसेच त्या वर नमूद केलेल्या कंपन्यांप्रमाणे काही अपवादात्मक स्थितीत तात्पुरत्या कालावधीसाठी बरी-वाईट कामगिरी करीत आहेत का, या सर्वांचे आडाखे जर अनुकूल असतील तर असा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. हा सर्व अभ्यास आपल्याला करता येत नसेल तर किमान या क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकारांकडून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. बसल्याजागी मोफत मिळणाऱ्या 'टिप्स' किंवा फक्त ऐकीव माहितीच्या आधारे गुंतवणुकीचा निर्णय घातक ठरू शकते. त्यासाठीच हा सावधगिरीचा सल्ला! 

(लेखिका पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग प्रा. लि.च्या संचालक आहेत.)

संबंधित बातम्या