आयुर्विमा पॉलिसी निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल? 

अनिलकुमार सिंग
बुधवार, 27 डिसेंबर 2017

जसे आपले उत्पन्न आणि जबाबदाऱ्या वाढत जातात, तशी आपली विम्याची गरज वाढत जाते; पण आपल्यापैकी बहुतांश लोकांना या बदलत्या गरजा आणि आपल्या आयुष्यातील विम्याचे महत्त्व वेळेवर समजत नाही. आपल्यापैकी बहुतेक जणांसाठी विमा म्हणजे कर वाचविण्याचे एक साधन असून, आपण विमा विकत घेतो आणि विसरून जातो. फारच थोड्या लोकांना हे कळते, की बदलत्या गरजांनुसार अधिक रकमेची विमा पॉलिसी विकत घेणे आपल्याला संकटसमयी स्थैर्य देते. खरे तर आयुर्विमा पॉलिसी हे एकच असे साधन आहे, जे आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना दुर्दैवी प्रसंगी आर्थिक स्थैर्य देते. तसेच, अपंगत्व आणि आजारपणात देखील त्याची मदत होते. 

प्रत्येकाकडे पुरेशा विमा रकमेची आयुर्विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर विमा पॉलिसींचा आढावा घेऊन त्यानुरूप पुरेसे विमा संरक्षण प्राप्त केले पाहिजे. योग्य आयुर्विमा पॉलिसी निवडताना तीन महत्त्वाच्या निकषांचा विचार केला पाहिजे- संरक्षणाची पातळी, संरक्षणाचा प्रकार आणि आयुर्विमा कालावधी. हे तपासूनच अतिरिक्त विमा संरक्षण घ्यायचे की नाही, हे ठरविले पाहिजे. 

1) संरक्षणाची पातळी : आपल्या कुटुंबाची आर्थिक उद्दिष्टे आणि पैशांची आवक- जावक या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा आणि पैशांचे उपलब्ध स्रोत यांतील तफावत समजून घेतल्यास आपल्याला किती विमा संरक्षण आवश्‍यक आहे, याचा आढावा घेता येऊ शकतो. एक असा सर्वसाधारण सल्ला दिला जातो, की आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान दहापट विमा संरक्षण घ्यायला हवे. त्यासाठी टर्म इन्शुरन्ससारखा प्रकार किफायतशीर ठरतो. 

2) संरक्षणाचा प्रकार : वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्विमा योजनांची रचना केलेली असते. विशिष्ट मुदतीच्या विमा योजना कुटुंबाच्या सुरवातीच्या टप्प्यातील गरजा भागवतात व उत्पन्नाचे संरक्षण पुरवितात. लहान मुलांच्या विमा योजना उच्च शिक्षण आणि लग्नाच्या वेळी पुरेसा निधी उपलब्ध करून देतात. मुलांचे भविष्य सुरक्षित करतात. "युलिप'मुळे संपत्ती निर्माण करता येते. टर्म इन्शुरन्स अर्थात शुद्ध आयुर्विमा हा खऱ्या अर्थाने कमी हप्त्यात भक्कम संरक्षण देऊन तुमच्या पुरेशा विम्याची गरज भागवतात. आयुर्विमा कंपनी आरोग्य विमा योजनासुद्धा पुरवितात, ज्याद्वारे आर्थिक संरक्षण आणि व्यक्तिगत आरोग्य सुरक्षा मिळते. गंभीर आजारातून निर्माण होणाऱ्या अनिश्‍चिततेपासून संरक्षण होते. 

3) आयुर्विमा कालावधी : जेव्हा आपण आयुर्विमा पॉलिसींच्या संरक्षणाची पातळी आणि प्रकार ठरवतो, त्या वेळी आपले सध्याचे उत्पन्न आणि निवृत्तीसाठी उरलेली वर्षे यांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोन्ही गोष्टींचे गणित मांडून आयुर्विम्याचा कालावधी ठरवावा. यातून भविष्यात किती संरक्षण हवे आहे आणि किती रकमेचा हप्ता आपण भरू शकतो, याचा आढावा घेता येतो. 

वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून, कमवते झाल्यावर शक्‍य तितक्‍या लवकर पुरेसे सुरक्षा कवच पुरविणाऱ्या आयुर्विमा पॉलिसीची निवड करणे हिताचे व सुज्ञपणाचे ठरते. 
(लेखक आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य ऍक्‍चुरियल अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या