त्वचा आणि केसांचं आरोग्य

अर्चना माळी
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

त्वचा आणि केस हा शरीराचा आरसाच आहे. तजेलदार त्वचा चांगल्या व्यक्तिमत्त्वात भरच घालते. प्रत्येक ऋतूत त्वचा आणि केसांची काळजी वेगवेगळ्या पद्धतीने घेता येते. आता पावसाळी हवेत काळजी कशी घ्यायची, याचा विचार करायला हवा. त्यासाठी सर्वच ऋतूंमध्ये त्वचा आणि केसांचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

माणसाच्या व्यक्‍तिमत्त्वाची परीक्षा घेणाऱ्या ज्या अनेक बाबी आहेत, त्यामध्ये त्वचेचाही समावेश होतो. एखाद्या माणसाची उंची, जाडी ही जशी त्याची ओळख असते, तशीच त्वचाही त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचा एक भाग असते, त्यामुळे त्वचेची काळजी घेणं सर्वच वयोगटांतील व्यक्‍तींसाठी उपयुक्‍त ठरतं. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार, पुरेशी झोप, भरपूर पाणी, सौम्य व्यायाम व शांत स्वभाव यांची आवश्‍यकता असते. रोज नियमितपणे क्‍लिनिंग, टोनिंग व मॉइश्‍चरायझिंग करणे, हे निरोगी तजेलदार त्वचेचे रहस्य आहे. क्‍लिनिंगमुळे मेकअप प्रदूषण, धूळ इत्यादी त्वचेवरून काढून टाकण्यास मदत होते. टोनिंगमुळे त्वचेला नवीन चैतन्य प्राप्त होते आणि मॉइश्‍चरायझिंगमुळे त्वचेला ओलावा मिळतो. या प्रक्रियेला सीटीएन (क्‍लिनिंग, टोनिंग, मॉइश्‍चरायझिंग) असेही म्हणतात. 

नियमितपणे सीटीएन करणे जसे गरजेचे असते, तसेच त्वचा प्रकारानुसार, ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे आवश्‍यक असते. 

त्वचेचे दोन प्रकार असतात : तेलकट आणि कोरडी. तेलकट त्वचेवर फोड, मुरूम येणे साहजिक असते. तेलकटच्या विरुद्ध कोरडी त्वचा असते. कोरडी त्वचा निस्तेज दिसते, तिला नैसर्गिक ओलावा नसतो. 

 • त्वचेची काळजी घेताना रंगीबेरंगी साबणांना आकर्षित न होता त्वचा-प्रकारानुसार साबण/फेसवॉश निवडणे, सनस्क्रीनचा वापर करणे, नाइट क्रीम वापरणे अशा अनेक चांगल्या सवयी अंगी बाळगणे फायदेशीर ठरते. 
 • ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. जसे, हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेतील ओलावा कमी होऊन काळपटपणा येतो. अशा वेळी चांगल्या प्रकारचे मॉइश्‍चरायझर वापरावे. 
 • पावसाळ्यात चेहऱ्यावर धूळ जमतेच; शिवाय बॅक्‍टेरिअल इन्फेक्‍शन होण्याची शक्‍यता असते. अशा परिस्थितीत योग्य क्‍लिंझर वापरून त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते. 
 • उन्हाळ्यात त्वचा रापणे, टॅन होणे, त्वचा निस्तेज दिसणे असे त्रास होतात, तेव्हा चांगल्या प्रकारचे सनस्क्रीम वापरणे, होता होईल तेवढा कमी मेकअप करणे व शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे असते.
 • प्रकार, ऋतू त्याचप्रमाणे वयोगट हाही एक भाग आहे, ज्यामुळे त्वचेत अनेक बदल होतात. उतारवयात त्वचेला सुरकुत्या येऊ नयेत, म्हणून नियमित फेशियल करणे, अँटी-एजिंग क्रीमचा वापर करणे उपयुक्‍त ठरते. 
 • तेलकट त्वचेच्या मानाने कोरडी त्वचा उतारवयात फार लवकर सुरकुतलेली दिसते. त्यामुळे आहार, रोजच्या सवयी इत्यादी गोष्टींमध्ये थोडा बदल करून त्वचेतील लवचिकपणा राखली जाऊ शकते.

काळजी कशी घ्याल?

 • त्वचा व तिची काळजी हा एक असा विषय आहे, ज्याबद्दल जेवढे बोलू, वाचू तेवढे कमीच असते. जसा त्वचेचा प्रकार तशी तिची काळजी. आपले डोळे जसे अंतर्मनाचा आरसा असतात, तशी आपली त्वचा आपल्या आंतरइंद्रियांचा आरसा असते. आपण जे खातो, पितो, जसे वावरतो ते सर्व आपल्या त्वचेवर दिसते, त्यामुळे प्रत्येकाने त्वचेची काळजी घेणे आवश्‍यक असते.
 • तरुण वयात मुला-मुलींच्या चेहऱ्यावर मुरूम-पुटकुळ्या येतात, त्यामुळे सौंदर्यात, व्यक्‍तिमत्त्वात बाधा येते. अशा वेळी पुढील उपाय करावेत :
 • चेहरा दिवसातून २-३ वेळा स्वच्छ व भरपूर पाण्याने धुवावा.
 • फास्ट फूड, जंक फूड, बेकरी पदार्थ अतिप्रमाणात खाऊ नयेत.
 • गुलाबजल चेहऱ्याला टोन करून पोषण देते. रोज रात्री कापसाच्या बोळ्यावर गुलाबजल घेऊन चेहऱ्याला लावून झोपावे.
 • एलोवेरा जेल त्वचेला साफ करेल. ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावून ३० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाकावा.
 • मुरूम (पिंपल्स) फोडल्याने पू बाहेर येऊन चेहऱ्यावर अजून मुरूम येऊ शकतात, यामुळे मुरूम फोडू नयेत.
 • मुलतानी माती आठवड्यातून दोनदा लावल्यास मृत त्वचा निघून जाते.
 • नियमित स्क्रबिंग केल्याने मृत त्वचा निघून जाते.
 • तेलकट त्वचेसाठी सौम्य क्‍लिनिंग क्रीम आणि स्क्रब वापरणे योग्य. घरच्या घरी हळदीचे किंवा चण्याचे पीठ आणि दूध किंवा गुलाब जल असा पॅक तयार करून वापरल्यास त्वचा चमकदार होते. 
 • कोरड्या त्वचेसाठी मॉइश्‍चरायझर वापरावे आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
 • मिक्‍स त्वचा प्रकारात चेहऱ्याचा इंग्लिश ढ आकाराचा भाग (कपाळ व नाक) तेलकट, तर गालावर त्वचा कोरडी असते. अशा वेळी कोरड्या भागासाठी सौम्य क्‍लिन्झर आणि नियमित मॉइश्‍चरायझर, तर तैलीय भागासाठी क्‍लिन्झर आणि नियमित स्क्रबर वापरावे.
 • पावसाळ्यात सर्वांत जास्त समस्या जाणवतात त्या त्वचेसंदर्भात आणि केसांसंदर्भात.
 • पायांच्या बोटांमध्ये अँटी फगल पावडर टाकायला विसरू नका.
 • जास्त मेकअप टाळा. गरज वाटल्यास वॉटरप्रूफ मेकअप करावा.
 • चेहऱ्याला चंदन पावडर आणि गुलाबजल यांचा पॅक लावावा.
 • पावसाळ्यात केसांना जेल लावू नका. कारण, कोंडा होण्याची शक्‍यता असते.
 • केस धुण्यासाठी एक तास आधी कडूलिंबाच्या पानांचा तीन-चार चमचे रस लावावा. मग केस धुवावेत.

संबंधित बातम्या