वयस्थापन म्हणजे नक्की काय?

डाॅ. सीमा सोनीस
बुधवार, 20 डिसेंबर 2017

आधुनिक मापदंड वापरून केलेल्या अनेक संशोधनातून हेच सिद्ध झाले आहे, की सुयोग्य आहार हा वार्धक्‍यास रोखतो. हा सुयोग्य आहार नक्की कोणता, आहारातून वयस्थापन कसे साधता येईल, कोणती आहारीय द्रव्ये खावीत, काय खाऊ नये, याबद्दलची विस्तृत व शास्त्रीय माहिती देणारी लेखमाला सुरू करत आहोत. शरीर व मनाचे सौंदर्य जपणे, मेंदूचे एजिंग रोखणे, हृदय-किडनी-यकृत या अवयवांना कार्यक्षम राखणे हे सर्व संतुलित आहारातून कसे साध्य करता येईल, याचे ज्ञान या लेखमालेच्या माध्यमातून मिळू शकेल. 

वयस्थापन म्हणजे ‘वयाला रोखणे’. ‘शिर्यते तत शरीरम्‌’। या न्यायाने आपल्या शरीरातील पेशींची हळूहळू झीज होत असते. मृत झालेल्या पेशींची जागा नवीन सबल पेशी घेत असतात. वयाच्या साधारण तिशीनंतर नवीन सबल पेशी बनण्याची ही प्रक्रिया हळूहळू मंदावू लागते. ही जैविक प्रक्रिया अतिशय सूक्ष्म पातळीवर आपल्याही नकळत सुरू होते. मात्र जसजसे वय पुढे सरकते तसतसे एजिंगची लक्षणे आपल्याला जाणवू लागतात. हे एजिंग प्रत्येक व्यक्‍तीसाठी वेगवेगळ्या पातळीवर असते. वय झालेले कुणामध्ये ‘दिसते’ तर कुणामध्ये ते ‘जाणवते’! केस पांढरे होणे, टक्कल पडण्यास सुरुवात होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागणे, त्वचा ढिली पडू लागणे हे वयाचे दिसणे होय. याउलट हृदयाची कार्यक्षमता कमी होणे, शरीराला कष्ट सहन न होणे, सांध्यांची झीज होणे, झोप कमी होत जाणे अशा स्वरूपाची लक्षणे वय झाल्याची जाणीव करून देतात. काही व्यक्‍ती दिसायला तरुण दिसतात. मात्र, त्यांच्या शरीरातील अवयवयवांचे म्हणजे हृदय, फुप्फुस, यकृत, किडनी यांचे एजिंग झालेले असते. हे ‘बॉडी एजिंग’ फक्‍त वैद्यकीय चिकित्सकच ओळखू शकतात. याउलट काही व्यक्‍तींचे केस जातात किंवा चेहरा वयस्कर दिसतो; परंतु आतून मात्र ते अतिशय हेल्दी व तरुण असतात. काही जण आंतर्बाह्य दोन्ही अंगाने वयस्कर झालेले असतात. मात्र, त्यांची बुद्धी व स्मरणशक्‍ती चांगलीच शाबूत असते. अशा लोकांचे बॉडी एजिंग होऊनही ‘ब्रेन एजिंग’ मात्र झालेले नसते. 

एजिंगचे असे अनेक प्रकार आहेत. आपले वय पुढे सरकायला लागले, की आपण कुठल्या प्रकारात मोडतो ते हळूहळू समजू लागते. जसजसे वय वाढत जाते तसतसे गाठीशी येणारा अनुभव, पैसा, मानसन्मान हा सर्वांनाच हवा असतो. मात्र त्याबरोबर येणारे ‘वयस्कर’ दिसणे मात्र प्रत्येक जण स्वीकारू शकतोच असे नाही. वाढणारे वय हे काही लोकांना शोभून दिसते, तर काहींना ते घाबरवते. काही जण वाढणाऱ्या वयाला मनापासून स्वीकारतात तर काही त्यापासून लांब पळतात. अशा वेळी ‘यंग’ दिसण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. शास्त्रीय नजरेने पाहिल्यास ‘यंग दिसणे’ आणि ‘यंग असणे’ यात मोठा फरक आहे. त्वचा, केस यांचे दिखाऊ तरुणपण आत्ताच्या युगात सहज शक्‍य झाले आहे; परंतु खरे तरुणपण हे आत आहे.

आपला मेंदू, हृदय, फुप्फुसे, यकृत, किडनी, धमनी यांचे कार्य निर्धोकपणे कुठल्याही बाह्य औषधांशिवाय चालू असणे यालाच खरे तरुणपण समजावे. आपले मन आनंदी असणे, त्याला नित्य नवीन शिकण्याची उमेद असणे हे तरुणपण मानावे. आरोग्याच्या वाटेवर स्वत:ला आयुष्यभर ठेवून वयाच्या ऐंशी किंवा नव्वदीतही तरुणपण जपणाऱ्या व्यक्‍ती आपण आपल्या आसपास पाहत असतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेत असतो. त्यांनी हे कसे साधले, यातले आपल्याला काय-काय करता येईल याचे अवलोकन करत असतो. वयाला रोखण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्नशील होणे यालाच ‘वयस्थापन’ असे म्हणतात.

वयस्थापनावरच्या उपचारपद्धती
वयाला रोखण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्याकडे पूर्वी फक्‍त आयुर्वेद व योगशास्त्र होते. सध्याच्या काळात होमिओपॅथी, अॅलोपॅथी, निसर्गोपचार, सौंदर्यशास्त्र, फिजिकल फिटनेस अशा अनेक चिकित्सापद्धतींची जोड आपल्याला लाभली आहे. या सर्व पॅथींकडून काही ना काही घेण्यासारखे आहे. एजिंगची लक्षणे जाणून, प्रथम त्यांची कारणे शोधणे आणि त्यानुसार योग्य त्या पॅथी किंवा शास्त्रप्रणालींचा उपयोग करावा.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीला कौटुंबिक विवंचनेमुळे अकाली वार्धक्‍याची लक्षणे निर्माण झाली असतील तर अशा वेळी नुसतेच सौंदर्योपचार किंवा व्यायाम करून ती लक्षणे दूर होणार नाहीत. त्या व्यक्‍तीला आधी समुपदेशन करणे अधिक गरजेचे आहे. वयस्थापनाविषयी प्रत्येक व्यक्‍तीची गरजही वेगवेगळी असू शकते. कुणाकुणाला फक्‍त त्वचा किंवा केसांची समस्या असेल तर कुणाच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्याची किंवा हाडांची झीज झाल्याची तक्रार असेल. एकाच समस्येची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे, केस गळण्याच्या समस्येमागे निकृष्ट आहार, काळजी-चिंता, क्षारयुक्‍त पाणी किंवा हायपोथायरॉइड यापैकी कुठलेली कारण असू शकते. म्हणूनच वयस्थापनामध्ये उपचारपद्धती वापरताना व्यक्‍तिसापेक्ष कारणमीमांसा महत्त्वाची असते. 

अकाली वार्धक्‍य कशामुळे येते?
एन्वायरमेंटल थ्रेटस्‌ टू हेल्दी एजिंग या पुस्तकात वार्धक्‍याची लक्षणे निर्माण करणारी काही प्रमुख कारणे मांडली आहेत, ती अशी :

(१) चुकीच्या आहारीय सवयी (२) व्यायामाचा अभाव (३) घातक रासायनिक गोष्टींशी संपर्क (४) अन्नातून, पाण्यातून शरीरात पेस्टिसाईड्‌स जाणे (५) प्रदूषण (६) आर्थिक किंवा सामाजिक ताण प्रगत राष्ट्रांसाठी वयस्थापन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे यासंदर्भात बरीच मोठी संशोधनं होत आली आहेत.

या सर्व संशोधनांमधून वार्धक्‍यनिर्मितीस हातभार लावणाऱ्या काही ठळक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :
(१) प्रखर ऊन (२) प्रदूषण (३) जनुकीय कारणे(४) कौटुंबिक/आर्थिक संकट  (५) सामाजिक अस्थिरता (६) रासायनिक घटकांचा उपयोग  (७) चुकीची जीवनशैली 
वरील सर्व कारणे पाहता लक्षात येते, की यातील बहुतेक कारणे ही आधुनिकीकरणातून निर्माण झालेली आहेत. ही कारणे पूर्णत: घालवणे शक्‍य नसले तरी व्यक्‍तिगत पातळीवर आपण प्रत्येक जण अकाली वार्धक्‍य टाळण्यासाठी काही उपाययोजना करू शकतो. या उपाययोजना कोणत्या त्या आता जाणून घेऊया.

व्यक्‍तिगत पातळीवरील वयस्थापनाचे मार्ग
पुरेशी झोप :
प्रत्येक प्रौढ व्यक्‍तीने सात-आठ तास रात्रीची झोप घेणे अपेक्षित आहे. नवीन संशोधन असे सांगते, की पुरेशी झोप ही वार्धक्‍यास दूर ठेवते. अभ्यासाअंती हेही लक्षात आले आहे, की आठ तासांपेक्षा अधिक झोप ही आरोग्यास फायद्याची नाही. थोडक्‍यात, कमी झोप वा अतिरेकी झोप अशी दोन्ही टोके गाठू नयेत. गरज वाटल्यास दुपारी वामकुक्षी घ्यावी. ही झोपही अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ नसावी.

उन्हापासून व प्रदूषणापासून संरक्षण : प्रखर उन्हामुळे फोटोएजिंग होते. म्हणजेच त्वचा व डोळे यांवर परिणाम होतो. त्वचेच्या संरक्षणार्थ बाजारात सनब्लॉक क्रीम उपलब्ध आहेत. यालाच स्वस्त व तितकाच उपयुक्‍त पर्याय म्हणजे उन्हात अधिक काळ फिरताना गॉगल, स्कार्फ व सनकोट यांचा वापर करावा. त्वचा झाकण्यासाठी सुती कपड्याचा वापर योग्य ठरेल. हवेतील प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क, हेलमेट किंवा स्कार्फचा वापर करावा. व्यक्‍तिगत पातळीवर प्लाॅस्टिकचा वापर, गाड्यांचा वापर, फटाके, नदीत कचरा टाकणे इत्यादी बाबतीत प्रत्येकाने थोडे सामाजिक भान राखले तर प्रदूषणाची समस्या थोडीफार नियंत्रित होण्यास नक्कीच मदत होऊ शकते, हे ध्यानात घ्यावे.

व्यसनांपासून मुक्तता : दारू ही यकृत, किडनी व त्वचा खराब करते. धूम्रपान हे फुप्फुस, धमन्या व त्वचेचे एजिंग घडवून आणते. व्यसनी मनुष्य हा त्याच्या वयाच्या इतर व्यक्‍तींपेक्षा अधिक वयस्कर दिसतो. 

सकारात्मक दृष्टिकोन : आनंदी व सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्‍ती तरुण दिसतात, असे संशोधन सांगते. वयस्थापनेसाठी मनावर काम करणे गरजेचे आहे. जीवनाकडे पाहण्याचा स्पर्धात्मक दृष्टिकोन कमी करून शांत निरामय जीवनपद्धती स्वीकारल्यास शरीर आपोआप चैतन्यमय बनते. आपल्या मनस्थितीचा एजिंगवर चांगला-वाईट कसा परिणाम होतो, हे दीपक चोप्रा यांच्या ‘टाइमलेस बॉडी एजलेस माइंड’ या पुस्तकात छान विश्‍लेषण करून सांगितले आहे.

योगसाधना किंवा कलेची उपासना : योग ही शरीर व मनाला चिरतरुण ठेवणारी प्रभावी जीवनपद्धती आहे, हे सर्वश्रुत आहेच. संशोधन असेही सांगते, की ज्या व्यक्‍ती कुठल्या तरी कलेची साधना करतात त्यांचे तरुणपण जपले जाते. थोडक्‍यात, योग-कला-छंद यांना जीवनात अंतर्भूत केल्यास अकाली वार्धक्‍य येत नाही. 

नियमित व्यायाम : नियमित स्वरूपात कुठलाही व्यायाम किंवा शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्‍ती नेहमी त्यांच्या आहे त्या वयापेक्षा लहान दिसतात. कोणीही, कुठल्याही वयात व्यायामाला सुरुवात करून शरीराचे ‘बॉडी एज’ कमी करू शकतो. सत्तरीपुढील वयाच्या लोकांमध्येही व्यायामाने नवीन स्नायूनिर्मिती होऊन ‘मसलटोन’ सुधारल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. ‘औषधाविना आरोग्य’ या पुस्तकाच्या लेखिका डॉ. मराठे म्हणतात, ‘एकविसाव्या शतकाची गरज ही रोटी-कपडा-मकान-व्यवसाय ही समजावी.’ 

पोषक आहार : वयस्थानाच्या प्रयत्नांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान हे आहाराचे आहे. वयस्थापनाची सुरुवात ही पेशींपासून होते. या पेशींना पोषण पुरवतो तो आहार. आरोग्यशास्त्र असे मानते, की जे शरीर सकस अन्नावर पोसलेले असते ते सक्षम असते. जसे, शरीर कमी आजारी पडते, तसेच या शरीराची झीज होणे म्हणजे ‘एजिंग’देखील अत्यंत हळूहळू होते. आयुर्वेद व योगशास्त्र या आपल्याकडील दोन्ही शास्त्रांमध्ये आहार व वयस्थापन यांचा घनिष्ठ संबंध अधोरेखित केलेला आहे. आज जगभरात वयस्थापनासंदर्भात जी काही महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत, त्यातही पोषक आहाराला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आढळते.

आहारातून वयस्थापन : वरील सर्व विवेचनावरून आपल्या हे लक्षात आले असेल, की वय वाढ रोखणे आपल्या हातात नसले तरी वयस्कर न दिसणे किंवा तरुणपण जपणे हे आपल्याला शक्‍य आहे. जीवनशैलीत बदल करून आपण हे नक्की साधू शकतो. या सगळ्या प्रयत्नांमध्ये सोपा व प्रभावी उपाय म्हणून आहाराकडे पाहता येईल.

संबंधित बातम्या