मातृत्वाचं देणं

डाॅ.आरती व्यास
मंगळवार, 17 जुलै 2018

वंध्यत्वाचं प्रमाण वाढतं आहे. मूल जन्माला घालण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज अनेकदा भासते आहे; मात्र स्वतःमध्ये एक जीव तयार होणं ही बाईसाठी काही तांत्रिक गोष्ट नाही. त्यासाठी मनाची प्रसन्नता, जोडीदाराबरोबरचं प्रेम, कुटुंबाचा पाठिंबा हे सगळं हवं असतं. आपला रोजचा आहार-विहार याचाही परिणाम होत असतो. या सर्वांमधून एक जीव तयार होतो. तो जीव म्हणजे मातृत्वाचं देणंच. जोडीदाराबरोबरच्या सहजीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. नात्यांना नवा अर्थ देणाऱ्या या मातृत्वासाठी मुलगी/मुलगा वयात आल्यापासूनच काळजी घ्यायला हवी... 

मूल होणं हा तसा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही क्षण; पण या गतिमान काळात अनेक वैद्यकीय सुविधा असूनही या आनंदाच्या क्षणावर नवीन-नवीन अडचणींचे सावट येत आहे. वंध्यत्वाचे रुग्ण अधिक संख्येने समाजामध्ये दिसत आहेत. त्यासाठी केले जाणारे आधुनिक वैद्यकातील प्रगत उपचार हे अत्यंत खर्चिक आणि काही काळानंतर विविध उपद्रव निर्माण करणारे आहेत. म्हणून आयुर्वेदोक्त चिकित्सेची, उपक्रमांची, परिचर्येची गरज पुन:पुन्हा आपणासमोर मांडावीशी वाटते.

सध्या फर्टिलिटीपेक्षा इन्फर्टिलिटी हा शब्द लोकांच्या चटकन लक्षात येतो, कारण याचे प्रमाण खूपच वाढले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार दोन वर्षांच्या नैसर्गिक संबंधांनंतरसुद्धा जर गर्भधारणा होत नसेल तर अशा जोडप्यांना वंध्यत्व (इन्फर्टिलिटी) आहे, असे म्हणता येईल. संपूर्ण जगभरात ३०-४०% स्त्रियांमध्ये, तर १०-३०% पुरुषांमध्ये वंध्यत्वाशी निगडित दोष किंवा तक्रारी आढळतात. बीजदोष, आधुनिक जीवनशैली, ताणतणाव आणि आजूबाजूच्या वातावरणातील प्रदूषण हे वंध्यत्वाच्या तक्रारी वाढण्यामागे कारणीभूत आहेत. 

आजकाल स्त्री-पुरुषांचं लग्नाचं व गर्भधारणेचं वय पुढे चाललं आहे. रोजचा प्रवास, दगदग, सध्याच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील कामामुळे वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली, बदललेला आहार यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर नकळत फार ताण पडत असतो. त्यामुळे स्त्रीबीज व पुरुषबीजाची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. त्यांच्यामध्ये वातदोषाशी निगडित लक्षणं वाढून वारंवार गर्भपात, गर्भाची अपुरी वाढ, वंध्यत्व अशा काही तक्रारी वाढलेल्या दिसतात.

याच्या कारणांचा जर विचार केला, तर गर्भधारणेपूर्वीची त्या स्त्रीची असणारी अनियमित पाळी, अनियमित रक्त स्ऱान, त्या वेळच्या इतर शारीरिक व मानसिक तक्रारी, ग्रंथील प्रवृत्ती, वाढलेले वजन, पीसीओडी, थायरॉइडसारखे आजार, पोषक आहाराची व विश्रांतीची कमतरता, यांचा नक्की विचार करावा लागेल आणि पुरुषांमध्ये अतिउष्णता, मानसिक ताणतणाव यामुळे तसेच उच्चरक्तदाब, डायबेटीस, शुक्रजंतूंचा अभाव, लैंगिक समस्या, यांचा त्यांना सामना करावा लागतो.

माता-पित्याचे वय जास्त असेल, मधुमेह असेल, नात्यात काही जनुकीय आजार असतील, तर बाळात व्यंग येण्याची शक्‍यता असते. आई-वडिलांना गर्भधारणेपूर्वी कोणते आजार आहेत, यासाठी ते जी औषधे घेतात त्यांचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी दोघांनीही योग्य चिकित्सा घेऊन व्याधीचा नाश केल्यास, मुलांमध्ये अनुवंशिक व्याधीचे प्रमाण कमी दिसेल. दिवसेंदिवस गर्भपात, गर्भविकृती, गर्भजल समस्या, स्थौल्य, मधुमेह, थायरॉइड, कॅन्सर, उच्चरक्तदाब, यांचं प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये वाढत आहे, त्याला जर आळा घालायचा असेल तर त्यासाठी भावी मातापित्यांनी त्यांच्या आजाराबद्दल माहिती करून घ्यावी. त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक चिकित्सेची संपूर्ण पडताळणी करायला हवी. डॉक्‍टरांशी चर्चा करून समाधानकारक उत्तरं शोधावीत.

आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पुढीलप्रकारे वर्गीकरण केलेले आहे, ज्यांची आजच्या काळात पण तंतोतंत उदाहरणं सापडतात.

काकवंध्या ः पहिल्या बाळंतपणानंतर अवाजवी किंवा चुकीच्या समजुतीतून जास्तीत जास्त जेवण करणे, व्यायामाचा संपूर्ण अभाव, बाळंतपणानंतर दूध यावे म्हणून विचार न करता केला जाणारा गोड, तेलकट-तुपकट पदार्थांचा भडीमार, शून्य व्यायाम, सतत बसून टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर, जर पूर्वी काही औषधे घेतली असतील तर त्याचा दुष्परिणाम स्त्रियांचं वजन पूर्ववत न होता वेगानं वाढत राहतं, या सर्वांतून दुसऱ्यांदा गर्भधारणेला अडथळा निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत. आपल्याकडे पूर्वी स्त्रियांना खूप काम असायचं. पौष्टिक आहार असायचा; परंतु सध्याच्या काळात तिच पद्धत वापरली जात असल्यामुळे स्त्रीला व संपूर्ण कुटुंबाला याचा फटका बसतो आहे. 

अनापत्या - अतिउष्णतेमुळे / अतिरक्तस्रावामुळे / पाळीच्या तक्रारींमुळे / गर्भाशय बलहीन झालेलं असतं. त्यात पिशवी साफ करणं /गर्भपात/गाठी पडणं यामुळे गर्भाशयाच्या पोकळीवर परिणाम होऊन बीज तयार होण्यात अडथळे निर्माण होतात आणि मूल होण्यात अडचणी येतात.  

गर्भस्रावी ः गर्भ न टिकणं यालाच गर्भस्रावी/गर्भपात म्हणतात. यात हृदयाचे ठोके थांबणं, गर्भाचे काही भाग पडून जाणं, गर्भाशयात काहीही अंश शिल्लक नसणं, कुठल्याही चिकित्सेनं तो न थांबणं असे विविध प्रकार आहेत.
एकदा दिवस राहिल्यानंतर मध्येच काही महिन्यांनी अर्धवट गर्भ पडून जातो व पुढे गर्भधारणा होत नाही, अशी तक्रार कानावर येते. आयुर्वेदानुसार अशावेळी विकृत उष्णता वाढून आम्लपित्तासारखी लक्षणं दिसून गर्भाशयाला सूज दिसते. 
स्त्री आधीच उष्ण प्रकृतीची मानली आहे. त्यात विविध औषधे, आंबट, तिखट याने पाळीच्या वेळी जास्त त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णाला गर्भपातानंतर लगेच काही औषधे, विश्रांती, लैंगिक संबंध बंद, आहारातील बदल आणि शेक-शेगडी यांच्या माध्यमातून पुढच्या ३-६ महिन्यांत शरीर आणि मन पूर्ववत करून मग पुढच्या गर्भधारणेला सामोरे जायला हवे. अशावेळी पतीची आणि घरच्यांची साथ मोलाची ठरते.

मृतवत्स ः बऱ्याचवेळा बाळाचे आसन, नाळेच्या विकृती, गर्भजलाच्या विकृती या समस्यांमुळे जन्मावेळी बाळ मृत होण्याचं प्रमाण वाढतं. दिवस पूर्ण होण्याच्या आतच कळा येणं, पुरेशा कळा न येणं, औषधं देऊनही त्याचा उपयोग न होणं या तक्रारींमध्ये वाताच्या विकृती दिसून येतात, ज्यामुळे मृत बाळ जन्माला येतं. तिची मानसिक अवस्था समजून घेणं, तिच्या थोडं कलाने घेणं, तिची सगळ्यांनी काळजी घेणं सगळ्यांच्या दृष्टीने गरजेचं वाटतं. 

बलक्षया ः गर्भिणीमध्ये आढळणारी आणखी एक धोक्‍याची सूचना म्हणजे वाढलेला रक्तदाब, ज्यामुळे गर्भिणीच्या इतर तक्रारींसोबत पोटातील गर्भ दगावल्याचीसुद्धा उदाहरणं दिसतात. आयुर्वेदानुसार काही विशिष्ट चिकित्सा पद्धती या तक्रारींवर अतिशय उपयुक्त ठरतात.
 
 जीवनसत्त्वे ः आधुनिक चिकित्साशास्त्रात जीवनसत्त्वांचे अत्यंत महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी हे सर्व नैसर्गिक स्वरूपातच मिळत असे, त्यामुळे कुपोषणजन्य आजार सहसा आढळत नसत. आयुर्वेदाने जीवनसत्त्वांचा उल्लेख चित्द्रव्ये/जीवनीय द्रव्ये म्हणून केला आहे.
         
 जीवनसत्त्वे अ कमतरता - याच्याअभावी वंध्यत्व येते. ज्याला आयुर्वेदाने दूध, तूप, लोणी यासोबत विविध वृष्ययोग किंवा बस्ती यांचा उपयोग करून चिकित्सा केली जाते. 
    जीवनसत्त्व ई च्या कमतरतेमुळेसुद्धा प्रजनन क्षमता कमी होते. ज्यावर मोड आलेले धान्य/मोड आलेल्या गव्हाची खीर/अनुपान म्हणून तांदळाचे धुवण आयुर्वेदाने सांगितले आहे.
            
 रक्तक्षय  - त्रिदोषांइतकेच रक्ताचे महत्त्व आहे. रक्तदुष्टी/रक्ताल्पता हे वंध्यत्वातील मुख्य कारण व लक्षण आहे. यासोबत पाळीच्या वेळी पोट दुखणे, गर्भाशयाला सूज येणे, अंगावर कमी जाणे, गाठी पडणे यामुळे वात-पित्त वाढून परिस्थिती अवघड बनते.
 अंत:स्रावक ग्रंथींचे विकार -
आयुर्वेदामध्ये अंत:स्रावक ग्रंथींसंबंधी स्वतंत्र असा विभाग नाही; परंतु विशिष्ट 
स्रावांचा मनुष्याच्या प्रकृतीवर परिणाम होतो. यामध्ये पौरुष ग्रंथींची बरीच जाणीव आढळून येते, ज्यात वृषण ग्रंथींची न्यूनता असली/ती काढून टाकली /तिची नीट वाढ झालेली नसली तर पुरुषत्वहानी झालेली आढळते. नपुंसकता आणि पुरुषत्व यांचा पुरेपूर संबंध आहे.

वंध्यत्व ः चरक आणि वाग्भट यांच्यानुसार वंध्यत्व हे बीजांश दुष्टी याअंतर्गत येते आणि मातृज, पितृज, आत्मज, सत्वज, सात्म्यज आणि रसज या षड्‌भावांपैकी कुठलेतरी एक कारण गर्भधारणा होण्यात अडथळा आणते. सामान्यत: मूल न होणं हे वाताच्या एकूण आठ रोगांपैकी एक कारण आहे. सध्याच्या काळात या तक्रारींमध्ये वाढ होण्याला इच्छुक जोडप्याचे दूषित बीज, अयोग्य आहार-विहारामुळे रस धातू दुष्टी आणि स्त्रियांमध्ये आर्तव दुष्टी कारणीभूत आहे. त्यामुळे जोपर्यंत या गोष्टींचे निराकरण संतुलित आहार, योग्य विहार, योग्य व्यायाम, ध्यानधारणा, निद्रा यांच्याद्वारे होत नाही तोपर्यंत कोणत्याही चिकित्सेचे यश दूरच/अवघड आहे.

स्त्री-पुरुषांमधील वंध्यत्वाच्या चिकित्सेत आयुर्वेदोक्त पंचकर्मामध्ये स्नेहन-स्वेदन-बस्ती-नस्य-वमन-विरेचन-योनिपिचू-उत्तरबस्ती यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आयुर्वेदोक्त चिकित्सा इतर चिकीत्सेसोबत पण घेता येतात. ज्याने रुग्णाला काही औषधांच्या साइड इफेक्‍ट्सचा सामना करावा लागणार नाही/भविष्यातील आजारांपासून सुटका मिळू शकेल.

गर्भाची उत्पत्ती
कामान्मिथुनसंयोगे शुद्धशोणितशुक्रज: 
गर्भ : संजायते नार्या: संजातो बाल उच्यते 

संभोग इच्छेने स्त्रीपुरुषांचा संयोग झाला असता शुद्ध असे स्त्रीचे आर्तव आणि पुरुषाचे शुक्र यापासून स्त्रियांस गर्भ उत्पन्न होतो. परंपरेच्या सातत्यासाठी वंशवृद्धी आहे आणि यांच्या धारण-पोषणासाठी आई-वडिलांच्या आरोग्याचा विचार महत्त्वाचा आहे. शुक्र व आर्तव यांचा संयोग झाला म्हणजे गर्भधारणा होते.
 
जोडप्याची प्राथमिक जबाबदारी 
मूल न होण्याचा दोष स्त्री/पुरुष कोणामध्येही असू शकतो किंवा दोघांच्या सर्व तपासण्या अगदी नॉर्मल असूनही तुम्हाला यामधून जावे लागते. त्यामुळे माझ्यात दोष आहे म्हणून रडत बसू नका किंवा स्वत:ला हिणवू नका. नवऱ्याने बायकोबद्दल व बायकोने नवऱ्याबद्दल वेळ काढलाच पाहिजे, एकमेकांना सपोर्ट केलाच पाहिजे.

 वंध्यत्व म्हटले की एक अशक्‍य गोष्ट म्हणून याकडे पहिलं जातं. बऱ्याचदा असे घडते, की अनेक स्त्रिया या मूलासाठी प्रयत्न करून कंटाळलेल्या असतात. डॉक्‍टर बदलतात, नैराश्‍यामध्ये जातात; पण हे न करता केवळ या प्रवासात मिळणाऱ्या सुखद अनुभवांची शिदोरी घेत कडू अनुभवांकडे दुर्लक्ष करणे हे श्रेयस्कर ठरते. या काळातील तुमचा आणि तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींचा सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला नैराश्‍यापासून वाचवू शकतो. ही सकारात्मकता तुम्हाला ध्यानाने मिळते. त्याने आत्मविश्वास वाढतो. शरीरात, मनात सकारात्मक बदल होतात. आजकाल तर गर्भधारणा झाल्यावर ध्यानधारणा करा, असे सुचवले जाते; परंतु याची खरी गरज यापूर्वीपासूनच आहे. वंध्यत्वावरील उपचारात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. गर्भधारणा केव्हा राहणार आहे हे पण नक्की नसते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी केल्याने त्याचा फायदा तुम्हाला आणि डॉक्‍टरांना पण होतो. मूल होत नाही म्हणून निराशा येऊन तुमचे करिअर, शिक्षण सोडू नका. सोडले असेल तर परत सुरू करा, आवडीचा छंद जपा, मन प्रसन्न ठेवा.

वैवाहिक आयुष्य- डॉक्‍टर आमच्या लग्नाला २ वर्षे झाली, गेले वर्षभर आम्ही मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सगळ्या तपासण्या झाल्या. दोघांमध्ये काहीही दोष नाही. मूल न राहण्याचे कारणच लक्षात येत नाही. समीर आणि शिल्पा सांगत होते. दोघांशीही बोलल्यानंतर असे लक्षात आले, की काही कारणांनी शिल्पाचा संबंधांच्या वेळी योनीमार्ग आवळला जातो, ज्यामुळे गर्भधारणेला वावच राहत नाही. 
खूपवेळा स्त्रियांमध्ये ही तक्रार दिसून येते. संबंधांच्या वेळच्या व इतर तणावामुळे त्या याबाबतीत उदासीन असतात. कधी तिटकारा असतो आणि या सर्वांचा परिणाम लैंगिक संबंध व्यवस्थित नसण्याकडे होतो. अशावेळी खूप पैसा व वेळ खर्च करूनही यश येत नाही. अशा रुग्णांशी मोकळेपणाने बोलून, यातील त्यांचे महत्त्व सांगून, शारीरिक तक्रारी कमी करून व मानसिक ताण आयुर्वेद व पंचकर्मातील काही चिकित्सा फायद्याच्या ठरतात.

कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी- वंध्यत्वाचा सामना करणारे जोडपे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या अक्षरशः खचलेले असते. गर्भधारणा होईल या आशेपोटी गरिबातली गरीब व्यक्ती कर्ज काढून खर्चिक उपचार घेते. गर्भधारणा होत नसेल तर जोडपे खचून जाते. परत काही काळानंतर कोणाच्या सांगण्यावरून किंवा जाहिरातींच्या माध्यमातून नव्याने उपचारांना सुरवात केली जाते; परंतु यात नुकसान होते ते रुग्णाचे. कारण यात वय वाढत जाते. आधुनिक औषधांच्या अतिवापराने शारीरिक-मानसिक तक्रारी वाढलेल्या असतात. अशावेळी वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांना समाजाने, घरातील व्यक्तींनी पाठिंबा देणे आवश्‍यक आहे. मूल न होण्याच्या कारणावरून निराशेने शिक्षण-नोकरी सोडलेले रुग्ण मी पाहिले आहेत. स्त्री आणि पुरुष दोघांचीही यात कुचंबणा होत असते. वाद सुरू होतात, जोडपी वेगळी होतात. स्त्रियांना कुठेच जाता येत नाही. माहेर-सासरचे दरवाजे बऱ्याच स्त्रियांचे बंद झालेलेच असतात. करिअर संपलेले असते. अशावेळी आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा व्यक्तींची आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, याचा विचार आपल्याला नक्की करावा लागेल. 

काळजी घ्या सुरवातीपासून
लहान मुली आपली सर्वांची जबाबदारी. मानव वंश जेव्हापासून विकसित झाला आहे तेव्हापासूनच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष एकमेकांसारखे कधीच नव्हते आणि नाहीत. या वेगळेपणाचे मूळ त्यांच्या शारीरिक जडणघडणीत आहे. फक्त स्त्रीच्याच पोटातून नवीन जीव जन्माला येतो, साहजिकच याचा अर्थ तिचे आणि पुरुषाचे बाह्यांग आणि अंतरंगही पूर्ण वेगवेगळे असले पाहिजे.

स्त्रियांच्या शरीरात वयाप्रमाणे अनेक बदल होत असतात, जे पुरुषांमध्ये होत नाहीत. त्यातला पहिला बदल वयाच्या दहा ते सोळा वर्षे या काळात होतो. या वयात त्यांची मासिक पाळी सुरू होणे, हे तिच्या शरीरात किती प्रमाणात चरबी आहे त्याच्याशी निगडित आहे.

लहान असल्यापासूनच मुला-मुलींच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलींची पाळी सुरू झाल्यापासून ते वयात येईपर्यंत मुलीच्या लठ्ठपणाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. तिच्या आहारातील उष्मांकांचा (कॅलरीज) विचार, जास्तीचा उष्मांक कमी करण्यासाठी व्यायाम करण्यास उद्युक्त करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच झाले पाहिजे. कारण मुलीच्या लठ्ठपणावरच पुढच्या पिढीचे भविष्य अवलंबून आहे.

जाहिरातींच्या विळख्यात अडकलेली जोडपी ः
वंध्यत्व ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात १५ ते २० टक्के जोडप्यांना वंध्यत्वाची किंवा नैसर्गिकरीत्या गर्भ न राहण्याची समस्या भेडसावत आहे. बदलती जीवनशैली, कामाचा ताण, उशिरा होणारी लग्ने, लग्नानंतर पुढे ढकललेली गर्भधारणा व त्यासाठी काहीही विचार न करता केलेले गर्भपात, मद्यपान, तंबाखू, गुटखा आणि धूम्रपान यांचे वाढत चाललेले प्रमाण, अयोग्य/ विकृत लैंगिक संबंध, पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिन्ड्रोम, स्त्रियांमधील फ्यालोपिअन ट्युबमधील ब्लॉक, क्षयाचा इतिहास अशी काही प्रजननक्षमता कमी होऊन वंध्यत्व वाढण्याची वैद्यकीय कारणे आहेत.

अशी जोडपी कौटुंबिक व सामाजिक दबावाने हैराण होऊन जाहिरातींच्या विळख्यात अडकतात आणि सुरू होते प्रत्येक उपाय करून बघण्याची स्पर्धा! यात निदान होण्यात वेळ जातो आणि योग्य उपचार मिळत नाहीत. यामुळे हे जोडपे खचून जाते. वैवाहिक आयुष्यात कुरबुरी सुरू होते. आर्थिक गणिते बिघडत जातात. कुटुंबातील व्यक्तींचे टोमणे, प्रत्येक नात्यात अविश्वासास, थोडक्‍यात मूल न होण्यामुळे कित्येक कुटुंबे विखरून जातात. 

पीसीओडी
दहा वर्षांमध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या, नोकरी करणाऱ्या युवती आणि काही प्रमाणात गृहिणींमध्ये पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिन्ड्रोम (पीसीओडी) चे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसते. यात विविध तक्रारींचा समावेश होतो.

थायरॉइडचे विकार ः यात तीन प्रकारे दोष दिसून येतात.  
मासिक पाळी- मासिक पाळी हे निसर्गाने स्त्रियांना दिलेले वरदानच आहे. स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीतून रक्त वाहून जाते (नैमित्तिक रक्तमोक्षण), यामुळे स्त्रीची प्रकृती निकोप राहते. कारण शरीर शुद्ध राहण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे. मासिक पाळी अनियमित झाली/स्राव अयोग्य प्रमाणात झाला/पाळी येण्याचे कार्य बिघडले की स्त्रीची प्रकृती बिघडते. अलीकडे रोग आतल्याआत दाबून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे आणि यासाठी औषधांचे सेवन पण वाढले आहे; परंतु यामुळे रक्तात दोष जास्त प्रमाणात वाढत आहेत. फायब्रॉइड, आमवात, मूळव्याध, उच्चरक्तदाब, रक्तपित्त, त्वचाविकार, अतिरक्तस्रावामुळे गर्भाशय काढून टाकावे लागणे, पाळी जाताना किंवा गेल्यानंतर (ऋतू निवृत्तीचा काळ) स्त्रियांचा रक्तदाब पुष्कळवेळा याच कारणामुळे वाढतो आहे.  

रक्तदुष्टी : रक्त म्हणजे सुंदर, रक्त म्हणजे सत्य, शरीरातील रक्त जीवनाचे कार्य करते. रक्तातून प्राण वाहतो, श्वासावाटे फुफ्फुसात शिरणारा प्राणवायू रक्तातील गोलकात मिसळून पुरविला जातो. रक्त हे शरीरव्यापी आणि मौल्यवान आहे, त्यामुळे त्याची हानी होणे, रक्त शरीरात न वाढणे, अशुद्ध रक्त फिरणे हे जीवनाला धोकादायक असते.

आपण जे अन्न खातो, त्याचा अन्नरस बनतो, त्यानंतर रस धातू बनतो आणि रस धातूपासून रक्त तयार होते. हळकुंडांना लिंबाच्या रसात पुन:पुन्हा भिजवले की कुंकवाचे रावे तयार होतात. आपल्या शरीरातील रंजक पित्त लिंबाचे काम करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा विविध कारणांनी रक्त बिघडते, पाळीच्या तक्रारी, गर्भाशयात गाठी, गाठी पडणे, उच्च रक्तदाब, अंगावर सूज, स्थौल्य, निद्रानाश, मूळव्याध होते, जे बऱ्याच रुग्णांमध्ये वंध्यत्वाचे एक कारण असते.   

थोडक्‍यात आहारात गोड, आंबट, खारट, तिखट पदार्थ अतिवापरणे, अनियमित आहार घेणे, उन्हातान्हात हिंडणे, तंबाखू-दारू यांचा वापर, जागरण, मांसाहार आणि अतिप्रमाणात दूध, दही, पनीर, चीज यांचा वापर रक्त आणि पित्त प्रकोप करतो. असे हे रक्त बिघडण्याने बीज तयार होण्यावर व संतती होण्यावर परिणाम होतो. कारण रक्त सर्व शरीरात संचारणारा द्रव पदार्थ आहे. सर्व अवयवांचे आरोग्य किंवा अनारोग्य रक्तावर अवलंबून असते.

शस्त्रकर्म - स्त्रीचे आर्तव आणि पुरुषाचे वीर्य एकत्र येऊन ज्या क्षेत्रात (गर्भाशय) उगवते, त्या क्षेत्राची शुद्ध असणे हे प्रत्येक जोडप्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. सध्या याची गरज विविध कारणांनी वाढली आहे. स्त्रीचे गर्भाशय गर्भाला नऊ महिने धारण करत असल्यामुळे तिच्या गर्भाशयाची कार्यपद्धती आणि रचना जोपर्यंत नैसर्गिक असत नाही तोपर्यंत बाळाचे धारण, पोषण व वर्धन होऊ शकत नाही. स्त्रियांमधील वाढत्या पित्ताच्या तक्रारी आणि उदासीनता आणि पुरुषांमधील वात प्रकृती आणि वाढते वाताचे विकार यामुळे होणारी संतती सदोष असते. अशा जोडप्यांना होणाऱ्या मुलांमुलींमध्ये वात गुणांचे प्राबल्य आणि निराशेचे प्रतिबिंब उमटताना दिसतेय. 

एक विवाहित स्त्री. वय २४ वर्षे. प्रकृतीने कृश होती. मासिक पाळी अनियमित असे. लग्नाला दोन वर्षे झाली; पण गर्भधारणा नाही. क्‍युरेटिंग केले, त्यानंतर तिला सहा तासांनंतर पाळीतून गाठीयुक्त रक्तस्राव सुरू झाला जो आठ दिवसांपर्यंत सुरू होता. आयुर्वेदानुसार गर्भाशय हे अपान वायूचे स्थान आहे. क्‍युरेटिंग करण्याने वातस्थानावर आघात झाला होता. मग तिला वातपित्तशामक चिकित्सा, आहार-विहार, विश्रांती यांचा उपयोग केल्यानंतर ३-४ दिवसांत गाठी पडण्याचे प्रमाण कमी होत पुढच्या चार दिवसांत रक्तस्राव थांबला. पुढच्या पाळीनंतर औषधोपचाराच्या साह्याने प्रथम अनियमित पाळीची तक्रार दूर झाली. कालांतराने बीजनिर्मिती होऊन संपूर्ण दिवसांची गर्भधारणा आणि बाळंतपण सुखरूप होऊन तिने गोंडस बाळाला जन्म दिला.

सिझेरियन व सूतिकावस्था न पाळल्याने होणारे विकार- आजकाल विविध कारणांनी, स्त्रियांच्याच अनाठायी भीतीमुळे, पुढे स्वत:च्या दृष्टीने धोका नको, म्हणून डॉक्‍टरांनी सुचवल्यामुळे, कृत्रिम गर्भधारणेमुळे सिझेरियनचे आणि पेनलेस डिलिव्हरीचे प्रमाण अत्यंत वाढलेले आहे. त्यानंतर वेळ नाही म्हणून किंवा कधी डॉक्‍टरांनी नको सांगितल्यामुळे शेक-शेगडी-बाळंतकाढे आणि सुतिका परिचर्या यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम म्हणून दुसऱ्यांदा गर्भधारणेत अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता असते. 

वंध्यत्वाची चार मुख्य कारणांत विभागणी करता येईल.
अनुवांशिकता/बीजदोष - 
हा स्त्री किंवा पुरुषांमधील जैविक दोष असतो, ज्याचा आयुर्वेदात शरीरस्थानात उल्लेख सापडतो. बऱ्याचवेळा बीजदोषांमुळे येणारे वंध्यत्व असाध्य असते.
 आत्मदोष - भारतीय तत्त्वज्ञानानुसार आत्मा गर्भशय्येतील बीजधारणेसाठी महत्त्वाचा मानला आहे. कर्म किंवा कुलदोष याच्या प्रवासात अडथळा ठरू शकतात. आपल्या आजूबाजूला जोडप्याचे सर्व रिपोर्टस नॉर्मल असूनही केलेल्या कोणत्याच चिकित्सेला यश न आलेले किंवा जन्मलेली मुले अकाली मृत झालेली उदाहरणे आपण पाहतोच.
  
 गर्भाशयदोष - याचा विस्ताराने उल्लेख योनीरोगामध्ये आढळतो. यात अनुवांशिक आणि पॅथॉलॉजिकल यांचाही विचार केला आहे. यात कोणत्याही स्वरूपाने cervix ला आघात/उष्णतेचा संपर्क झालेला नसावा. (यात cautery या शस्त्रकर्माचा पण विचार करायला हवा, कारण गर्भाशय हे सगळ्यात नाजूक आणि गुंतागुंतीचे अवयव आहे हे आयुर्वेदाने सांगितले आहे.)

कालदोष - वयाच्या कोणत्या टप्प्यात गर्भधारणा होते, याचा गर्भाच्या रोगप्रतिकार क्षमता/भविष्यातील जडण-घडण यावर नक्की फरक पडताना व्यवहारात पाहायला मिळते.
मागच्या वर्षी रूपाली व तिचे पती दवाखान्यात खूप मोठी फाइल घेऊन आले होते. लग्नाला आठ वर्षे होऊन गेलेली. मागच्या पाच वर्षांपासून मूल होत नाही म्हणून ट्रीट्‌मेंट घेत होते. दोघांच्या तपासणीनंतर तिच्यात दोष आढळला. तिचे निदान एन्डोमेट्रीयोसीस म्हणून झाले होते. त्यानंतर तिच्या विविध तपासण्या, वेगवेगळे उपचार व विविध दवाखान्यांत चकरा सुरू झाल्या. सध्या एका नामांकित डॉक्‍टरांकडे त्यावरील उपचार सुरू आहेत; पण अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. हार्मोन्सच्या गोळ्या व इंजेक्‍शन यांचा दुष्परिणाम म्हणून वजन मात्र ८३ किलो झाले आहे. आता यामुळे ती दोघेही खचली आहेत. त्या स्थितीत ते माझ्याकडे आले. 

जगात लोकसंख्येच्या बाबतीत नंबर दोनवर असणाऱ्या व सतत लोकसंख्येची काळजी भेडसावणाऱ्या भारतात मूल नसणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा दुःखी दांपत्यांना बघितले की वाईट वाटते, सर्व महागडे उपाय, महागड्या तपासण्या करूनही यशाचे प्रमाण खूपच कमी आहे. 

आयुर्वेदात धान्योत्पत्ती व गर्भाची उत्पत्ती यात साधर्म्य दाखविले आहे. त्यानुसार उत्तम धान्य निर्माण होण्यासाठी ज्याप्रमाणे योग्य ऋतू, चांगले शेत, योग्य प्रमाणात पाणी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगल्या प्रतींच्या बीजाची गरज असते, त्याचप्रमाणे गर्भ निर्माण होण्यासाठी असते. ऋतू याचा अर्थ पाळीचा योग्य कालावधी- जेव्हा गर्भधारणा होऊ शकते. क्षेत्र म्हणजेच गर्भाशय, अम्बु म्हणजेच रसरक्त इ. चा योग्य पुरवठा ज्याने गर्भाचे पोषण होते व बीज म्हणजेच स्त्री (ovum) व पुरुष (स्पर्म) यांचे बीज! जेव्हा हे सर्व उत्तम प्रकारे जुळून येईल तेव्हा गर्भधारणा काहीही व्यत्यय न येता सहजपणे येते. शरीर व विशेषतः पुनरुत्पत्ती करणारे अवयव पूर्ण निरोगी व स्वस्थ हवे. पुरुषबीज व स्त्रीबीज चांगल्या प्रतीचे हवे. हा आयुर्वेदाचा विचार आहे.

उपचारपद्धती ः पंचकर्म : एखादा दोष/व्याधी वाढली असताना फक्त आहार/औषधांनी आटोक्‍यात ठेवणे खूप कठीण जाते. असे हे दोष शरीराबाहेर काढून शरीर शुद्ध होते, त्याला शोधन चिकित्सा/पंचकर्म म्हणतात. थोडक्‍यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगातून मुक्त होण्यासाठी या उपक्रमांची मदत घेता येते. मात्र हे उपाय करताना पूर्वकर्म, ऋतू, दोषांची अवस्था, रोगाची अवस्था, रुग्णाची प्रकृती या सर्वांचा विचार व्हायलाच हवा. 

आहार : आपला देह आणि आहार दोन्ही पांचभौतिक असतील तरच ते अंगी लागेल. कुठलेही अन्न टाळू नका, ते संतुलित आहे ना हे बघा. तडस लागेपर्यंत खाऊ नका. तिखट, खारट, आंबट, गोड, कडू हे सर्व रस शरीराला आवश्‍यक आहेत. बाहेरचे अन्न, कॉफी, कोल्ड्रिंक्‍स इ. अनेक पदार्थ आज बाजारात उपलब्ध आहेत. त्याने फक्त जिभेचे चोचले पुरवले जातील; पण याने तुम्ही तुमचे स्वत:चेच नुकसान करताय हे लक्षात घ्या.

व्यायाम : रुग्ण स्त्री असो वा पुरुष, व्यायामाचे महत्त्व कमी होत नाही. यामध्ये तुमच्या आवडीनुसार मैदानी खेळ, पोहणे आणि योगशास्त्र यापैकी तुम्ही काहीही निवडू शकता; परंतु यात सातत्य मात्र हवेच.
झोप : रोजची शांत ६-८ तासांची झोप ही झालीच पाहिजे, ती नीट होत नसेल, खूप स्वप्नांनी अस्वस्थ झोप असेल तर उपचारांची मदत घ्या. जर तुम्ही यापेक्षा जास्त झोपत असाल तर खूप आळस भरेल. जेवणानंतर लगेच झोपू नका, दुपारी योगनिद्रा केल्याने परत ताज्यातवान्या होऊन व्यायामास तयार व्हाल. सकाळी लवकर उठून दिवस सुरू करा आणि झोपेची वेळ पक्की ठेवा.

श्वास : श्वासाचे महत्त्व आहारापेक्षा जास्त आहे. जर तुम्ही व्यायाम करत नसाल, ध्यान नसेल, बसण्याची पद्धत योग्य नसेल, तर तुमचा श्वास संपूर्ण असणारच नाही.

मित्र-मैत्रिणी : हे या टप्प्यातील सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. ज्या व्यक्तीशी मनमोकळे करून प्रसन्न वाटते, प्रॉब्लेम शेअर करता येतात अशा व्यक्ती तुमच्यासाठी खूपच आनंद घेऊन येतात. 
कुटुंबीय : प्रत्येक स्त्रीला जर घरातून पाठिंबा मिळाला तर ती निर्भयपणे पुढे जाऊ शकेल. ज्याचा फायदा भविष्यात या कुटुंबालाच होईल. मन हे घड्याळाच्या लंबकाप्रमाणे आहे. जे सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात जात असते. भूतकाळाच्या विचाराला काहीच अर्थ नसतो. भविष्याच्या कल्पनेने ते त्रस्त होते, त्याला वर्तमानात जगायला शिकवले पाहिजे.

माणूस शरीराचा जेवढा विचार करतो तेवढा मनाचा करत नाही. शरीर आणि मन दोन्ही एकच दिसत असले तरी ते पूर्णपणे वेगवेगळे आहेत. फक्त त्यांचे व्यवहार एकमेकांशी निगडित आहेत. मनाचा विचार, त्याची ताकद याचा आपल्या अध्यात्मात आणि आयुर्वेदात मात्र अतिशय सूक्ष्म पातळीवर विचार झाला आहे. आयुर्वेदाने शरीराची घाण बाहेर काढण्यासाठी पंचकर्माची, तर मनाची घाण बाहेर काढण्यासाठी आणि मनाची ताकद वाढवण्यासाठी  ध्यानाची उपाययोजना सांगितली आहे; परंतु यासाठी हवी मनाची एकाग्रता आणि आपले स्वच्छ आचरण/आहार-विहार/योग्य दिनचर्या/ऋतुचर्या.प्रत्येक स्त्री-पुरुषाला-कुटुंबाला आपले मूल देदीप्यमान हवे असते; परंतु नुसत्या विचाराने ते संभव नाही. त्यासाठी ताकदवान मन, दृढनिश्‍चय, योग्य असलेल्या चिकित्सेवर श्रद्धा आणि सबुरी यांचा संयोग फलद्रुप होतो.

ॐ सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: 
ख सर्वे भद्राणि पश्‍यन्तु ख मा कश्‍चिद्दुःखभाग्भवेत्‌।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।। 

संबंधित बातम्या