चॉकलेटचा रंजक प्रवास

निर्मिती कोलते
गुरुवार, 31 मे 2018

एका छोट्याशा भागात चॉकलेटचा वापर सुरू झाला आणि अल्पावधीतच या चॉकलेटच्या चवीनं जगाला भुरळ घातली. चॉकलेटच्या या चवीनं अवघं जग कसं काबीज केलं आहे, कोणकोणत्या पद्धतीनं चॉकलेटचा वापर झाला आणि सध्या होतो आहे, याचा रंजक आढावा..

ऑल यू नीड इज लव्ह बट अ लिटिल
चॉकलेट नाऊ अँड देन डझन्ट हर्ट
- चार्ल्स एम. शुल्झ

असा महिमा असणारे चॉकलेट! रागात, प्रेमात, भांडणात, एखादा क्षण साजरा करण्यात, एकटेपणात, आजारपणात सगळ्या आघाड्यांवर कधी संपूर्ण तर कधी तुकड्या तुकड्यात साथसोबत करणारे! असं हे गोड चॉकलेट सुरवातीला मात्र कडू स्वरूपातच लोकप्रिय होते. मेसोमेरीकन्स जे आत्ताच्या मेक्‍सिकोच्या परिसरात राहायचे त्यांनी प्रथम कोकोची लागवड इ. स पूर्व ३५० च्या आसपास केली, अशी इतिहासात नोंद आहे. कोको बिन्सना आंबवून, भाजून, त्याची पेस्ट केली जायची आणि त्यात पाणी, व्हॅनीला, मध, मिरच्या आणि इतर मसाले घालून त्याचं पेय बनवलं जायचं. ओल्मेक संस्कृ तीमध्ये धार्मि क आणि वैद्यकीय कारणांसाठीच चॉकलेटचा वापर मर्यादित होता. मायन संस्कृतीमध्ये तर कोकोची पूजा करण्याची पद्धत होती. सोळाव्या शतकापर्यंत युरोपियन लोकांना चॉकलेटच्या अस्तित्वाचीसुद्धा खबर नव्हती. स्पॅनिश लोकांनी चॉकलेट युरोपात आणलं. चॉकलेटमध्ये मध किंवा साखर घालून त्याला गोड करण्याचं श्रेय त्यांनाच जातं. हळूहळू इतर देशांमध्ये त्याची लोकप्रियता वाढू लागली.

१७६० मध्ये स्थापन झालेली चॉकलेट लॉम्बार्ट ही फ्रान्समधली चॉकलेट बनवणारी पहिली कंपनी म्हणून ओळखली जाते. या काळापर्यंत जास्त करून चॉकलेट पेय स्वरूपातच प्रसिद्ध होते. त्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा १८४५ मध्ये स्वित्झर्लंड मधल्या Lindt & Sprungli या कंपनीनं घन स्वरूपातील चॉकलेट निर्मितीला सुरवात केली, तसंच १८४७ मध्ये जे. एस. फरी अँड सन्स या ब्रिटिश कंपनीने पहिला चॉकलेट बार तयार केला. चॉकलेटच्या प्रवासातलं हे महत्त्वाचं पर्व म्हणायला हवं. त्या नंतर हळूहळू चॉकलेट निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये नवनवीन शोध लागत गेले.

पुढे कॅडबरी, हर्शी या आणि अनेक कंपन्या नावारूपाला आल्या. तेव्हापासून आजतागायत हा चॉकलेटचा कडू-गोड प्रवास वेगवेगळ्या स्वरूपात चालू आहे. आणि लहानमोठ्यांच्या जिभेचे चोचले पुरवतो आहे. चवीत म्हणाल तर डार्क चॉकलेट, मिल्क
चॉकलेट, व्हाइट चॉकलेट, मिंट चॉकलेट, लिकर चॉकलेट, ऑरेंज चॉकलेट हे आणि असे असंख्य प्रकार लोकप्रिय आहेत. त्या चबरोबर आता बदाम, किसमिस असे ड्रायफ्रूटस घालून, शेंगदाणे, कुकीज वापरून असंख्य फ्लेवर्स उपलब्ध आहेत. जेम्स, एम.एम. यासारखे रंगीबेरंगी चॉकलेट्स कधीपासून सर्वांच्या मनावर राज्य करत आहेत. छोट्या छोट्या गोळ्या, बार, स्टिक्‍स असे अनेकविध आकार घेत चॉकलेट आपलं अस्तित्व टिकवून आहे. पुढे केक्‍समध्ये चॉकलेटने उडी घेतली आणि केकविश्‍वाचा अवघा चेहरामोहराच बदलून टाकला. चॉकलेट लाव्हा केक, चोको चिप्स केक, ब्राउनीज असे आणि अनेक प्रकार अबालवृद्धांना अक्षरशः भुरळ पाडतात. तीच गत आइस्क्रीमची! 

आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांमध्येसुद्धा चॉकलेटनं आपली वर्णी लावली आहे. त्या त्या देशातल्या पारंपरिक पदार्थांमध्ये मिसळून चॉकलेटनं आपली जागा बनवली आहे. चॉकलेट चिक्की, चॉकलेट मोदक, चॉकलेट बर्फी किंवा कलाकंद अशा पदार्थांमध्ये बेमालूमपणे मिसळून चॉकलेटनं सगळ्यांनाच आपलंसं केलं आहे. इतकंच नव्हे तर बिस्किटे, कुकीज, चॉकलेट कॉर्न फ्लेक्‍स, हेल्थ ड्रिंक्‍स यातही चॉकलेट्सचा बोलबाला आहे. आजकाल तर चॉकलेट-टी आणि कॉफी घराघरातल्या पाहुणचारात हिरिरीने पुढाकार घेतात. त्या तसुद्धा नवनवीन प्रकारांची रोज भर पडत असते आणि नुसत्या गोड पदार्थां तच नव्हे, तर वेगवेगळ्या तिखट पदार्थां तही चॉकलेटने उडी घेतली आहे. वेगवेगळ्या करी आणि ग्रेव्हि जमध्ये चॉकलेटची चव प्रसिद्ध होते आहे, हे आवर्जून सांगायलाच पाहिजे. मेक्‍सिकोचा प्रसिद्ध मोले सॉस हे याचं एक उदाहरण सांगता येईल. खाद्य जग जसं चॉकलेटनं काबीज केलं तसंच आरोग्य क्षेत्रा तही चॉकलेटनं शि रकाव केला आहे. अनेक औषधांच्या निर्मि तीत चॉकलेटचा उपयोग केला जातो. कॅन्सरला दूर ठेवण्या साठी चॉकलेट मदत करतं, तसंच हृदयाच्या आरोग्या साठी डार्क चॉकलेट उपयुक्त आहे. अर्थात मर्यादित प्रमाणात खाल्लं तरंच!

चवीच्या पलीकडे जाऊन सजावटीसाठीसुद्धा निरनिराळ्या रूपात चॉकलेट आपल्या दिमतीला उभं असतं. वाढदिवसाची भेट म्हणून किंवा अभिनंदनाचं प्रतीक म्हणून चॉकलेट बुके, चॉकलेट बॉक्‍स बाजारात उपलब्ध आहेत. जगभरात अनेक कलाकार चॉकलेटपासून अद्भुत अशा गोष्टी बनवत असतात. त्या पैकी एक म्हणजे चॉकलेटचे पुतळे! पक्षी, प्राणी, रोजच्या वापरातील वस्तूंसह मायकल जॅक्‍सनसारख्या लोकप्रिय कलाकारांचे पुतळेसुद्धा बनवण्यत आलेत. अगदी खुर्ची, टेबलसुद्धा! 

बेल्जियम, व्हिएन्ना, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये चॉकलेट म्युझियम अर्थात संग्रहालये उघडलेली आहेत. चॉकलेटचा इतिहास, ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या या वस्तू इथं जतन केल्या जातात. याशिवाय मुलांना चॉकलेटच्या नवीन पाककृती शिकवणं, नवीन फ्लेवर्सची ओळख करून देणं असे उपक्रमसुद्धा इथं घेतले जातात.
फॅशनच्या क्षेत्रात चॉकलेट ज्वेलरी, चॉकलेटपासून बनवलेले ड्रेस असे थक्क करणारे प्रकार आपली ओळख निर्माण करत आहेत.

कोकोच्या बियांपासून कोको बटर तयार केले जाते. त्याचा चॉकलेट बनवण्यासाठी उपयोग तर होतोच; पण सौंदर्य प्रसाधनांमध्येसुद्धा वापर होतो. आजकाल चॉकलेटचा
वापर फेशिअल, स्पा ट्रिटमेंट्स, हेअर मास्क यासारख्या सौंदर्य खुलविणाऱ्या या प्रकारांमध्येही होऊ लागला आहे. चॉकलेटच्या वासानं दरवळणारे परफ्युम, क्रीम्स तरुणाईमध्ये तर तुफान लोकप्रिय आहेत. एक अजून नावीन्यपूर्ण प्रकार म्हणजे चॉकलेट फाउंटन अर्था त चॉकलेटचे कारंजे! लग्न, वाढदिवस अशा समारंभांमध्ये ही चॉकलेटची कारंजी भाव खाऊन जात आहेत.

चॉकलेटचा महिमा इतका सर्वदूर पसरला आहे की खास ‘चॉकलेट डे’ साजरा केला जातो. मराठी बालगीतात ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ असं म्हटलं आहेच आणि हिंदी सिनेसंगीतातसुद्धा माधुरी दीक्षितच्या ‘चॉकलेट लाइम ज्यूस’सारख्या गाण्यां मध्ये चॉकलेट सुपरस्टार झाले आहे. चॉकलेट या नितांत सुंदर अशा इंग्लिश चित्रपटाची कथा एका चॉकलेट बनवणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यातल्या चढउतारावर गुंफली गेली आहे. जगाच्या एका कोपऱ्या तून सुरू झालेला चॉकलेटचा प्रवास आता जगाच्या कानाकोपऱ्यातल्या घराघरात जाऊन स्थिरावला आहे. चव, रूप, गंध अशा सगळ्या प्रकारांनी मनाला आणि जिभेला भुलवून टाकणारं हे अजब रसायन आहे! मैत्री जुळवणारं, प्रेम फुलवणारं आणि नाती जपणारं अशी चॉकलेटची ख्या ती झाली आहे.
त्या मुळंच चॉकलेटच्या अनुषंगानं कुछ मीठा हो जाये.. या ओळी आपसूकच येतात.

संबंधित बातम्या